‘त्या’ मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल; काँग्रेसची लाजच काढली
आम्ही संसदेची निर्मिती केली. देशाच्या भविष्याची चिंता म्हणून नवी संसद भवन उभारण्यात आली. संसदेत सत्ताधारी आणि विरोधक असतात. ते जनतेचं प्रतिनिधीत्व करतात.
नवी दिल्ली | 6 ऑगस्ट 2023 : आम्ही विकासाच्या पथावर चाललो आहोत. पण या पथावर जात असताना काही लोक आपला मूळ मार्ग सोडायला तयार नाहीत. विरोधी पक्ष आजही जुन्या वळणावर चालला आहे. ते आजही काही करत नाहीत. दुसऱ्यांना काहीच करू देत नाही. काम करणार नाही आणि करू देणार नाही अशा मार्गावर विरोधक चालले आहेत. याची चिंता वाटते, असं सांगतानाच राष्ट्रीय युद्ध स्मारकाची आम्ही निर्मिती केली. त्यालाही विरोधकांनी नावे ठेवली. ही नावे ठेवताना त्यांना लाज कशी वाटली नाही?, असा संतप्त सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काँग्रेसचं नाव न घेता मोदी यांनी ही टीका केली.
देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीचा शिलाण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यात महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. आम्ही संसदेची निर्मिती केली. देशाच्या भविष्याची चिंता म्हणून नवी संसद भवन उभारण्यात आली. संसदेत सत्ताधारी आणि विरोधक असतात. ते जनतेचं प्रतिनिधीत्व करतात. पण विरोधकांच्या या गटाने संसदेच्या नव्या इमारतीचा विरोध केला. आम्ही कर्तव्य पथाचा विकास केला त्याचाही विरोध केला. या लोकांनी 70 वर्षात देशातील वीर शहिदांचं वॉर मेमोरियही बनवलं नाही. जेव्हा आम्ही वॉर मेमोरियल तयार केलं, तेव्हा त्याच्यावरही टीका करताना त्यांना लाज वाटली नाही, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढवला.
ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेले नाही
सरदार पटेलांचा स्टॅच्यु ऑफ युनिटी आज जगातील सर्वात मोठी मूर्ती आहे. प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान वाटतो. काही लोकांना निवडणुकीत पटेलांची आठवण येते. पण यांचा कोणताही मोठा नेता स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेला नाही. त्यांचं दर्शन घेतलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.
आम्ही सकारात्मक
पण आम्ही देशाच्या विकासाला सकारात्मक राजकारणाने पुढे न्यायचा निर्णय घेतला आहे. नकारात्मक राजकारण बाजूला ठेवून एक मिशन म्हणून आम्ही जात आहोत. कोणत्या राज्यात कुणाचं सरकार आहे. कुणाची व्होट बँक आहे याकडे दुर्लक्ष करून आम्ही विकास करत आहोत. आम्ही विकासासाठी जीवाची बाजी लावत आहोत, असंही ते म्हणाले.
मोदींच्या तीन घोषणा
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन घोषणा दिल्या. घराणेशाही इंडिया छोडो, तृष्टीकरण इंडिया छोडो आणि भ्रष्टाचार इंडिया छोडो अशा घोषणा देत मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला.
रेल्वे विकासाचं प्रतिक
भारतात होत असलेला विकास पाहता संपूर्ण देशाचे लक्ष भारताकडे लागलं आहे. देशातील नागरिकांनी 30 वर्षानंतर संपूर्ण बहूमताने सरकार स्थापित केलं. त्यामुळे सरकारने फटाफट निर्णय घेतले, असं सांगतानाच भातीय रेल्वे हे विकासाचे प्रतिक बनेल. गेल्या काही वर्षात रेल्वेने केलेल्या विकासाची आकडेवारी थक्क करणारी तर आहेच शिवाय हैराण करणारीसुद्धा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.