Shivsena vs Eknath Shinde Group : दादरमध्ये घमासान! शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा, राड्याचं कारण नेमकं काय?
शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. 'आवाज करणार...तर...ठोकणारच...आज पेग्विन सेनेला...स्वतःची लायकी समजलीच असेल..' असं म्हणत संतोष तेलवणे यांनी फेसबकुवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.
मुंबई : शिवसैनिकांनी शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे (Santosh Telwane) यांना मध्यरात्री दादरमध्ये मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. या राड्यावेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला, असा आरोप सुनील शिंदे यांनी केलाय. तर सदा सरवणकर यांनी आपल्यावर करण्यात आलेला आरोप फेटाळून लावला आहे. शिंदे गटाला सत्तेचा माज आला असल्याचं म्हणत सुनील शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे. यावेळी झालेल्या गोळीबारातून एक पोलीस जखमी होता होता थोडक्यात वाचला, असंही सुनील शिंदे यांनी म्हटलंय.
रात्री नेमकं काय घडलं?
शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान स्वागत कक्षावरुन बाचाबाची आणि एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी झालेल्या बाचाबाचीला उत्तर-प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. याबाबतचे व्हिडीओही सोशल मीडियात पोस्ट करण्यात आले होते.
विसर्जन मिरवणुकीत नेमकं काय झालं होतं? : Video
शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. ‘आवाज करणार…तर…ठोकणारच…आज पेग्विन सेनेला…स्वतःची लायकी समजलीच असेल..’ असं म्हणत संतोष तेलवणे यांनी फेसबकुवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.
दरम्यान, आक्षेपार्ह भाषेत बोलल्यामुळे शिवसैनिकांनी जाब विचारत शिंदे गटाच्या संतोष तेलवणे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. हे सगळं प्रकरण समजल्यानंतर सदा सरवणकरही दादर पोलीस स्थानकाच्या परिसरात दाखल झाले होते.
पाहा संतोष तेलवणे यांची फेसबुक पोस्ट
रात्री झालेल्या या तणावपूर्ण घडामोडींमध्ये सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून गोळीबार केला, असा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे. तर घरगुती भांडण झाल्याचं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. शिवाय त्यांनी गोळीबाराचा आरोपदेखील फेटाळून लावला आहे. दरम्यान, या संपूर्ण राड्यावेळी झालेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला होता.
लाईव्ह घडामोडी : Video
राज्यात सत्ता संघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. खरी शिवसेना कुणाची, यावरुन घमासान सुरु आहे. प्रभादेवीमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. सोशल मीडियातही शिंदे गट विरुद्ध शिवसैनिक हा वाद आता टोकाला गेला आहे. याच वादातून राजकीय राड्याला सुरुवात झाल्याचं यानिमित्ताने पाहायला मिळतंय. प्रभादेवी झालेल्या वादाचं हाणामारीत रुपांतर झाल्यानंतर आता राजकीय वातावरणही ढवळून निघालंय.