Mumbai hoarding collapse : होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेचा सुनील राऊतशी काय संबंध? नितेश राणेंचा थेट सवाल
Mumbai hoarding collapse : घाटकोपरमध्ये काल होर्डिंग दुर्घटना घडली. छेडा नगर येथे पेट्रोल पंपावर एक भलमोठं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत 14 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता राजकारण सुरु झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. होर्डिंग कंपनीच्या मालकाचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो व्हायरल झालाय.
मुंबईत काल एक मोठी दुर्घटना घडली. घाटकोपर छेडा नगर येथे पेट्रोल पंपावर एक भलमोठं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत 14 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. आता यावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. हे होर्डिंग ज्या कंपनीच होतं, त्याच्या मालकाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय. भावेश भिंडे असं या होर्डिंग कंपनीच्या मालकाच नाव आहे. त्याचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये तो उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना दिसतोय. यावरुन आता सत्ताधारी पक्ष उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत आहे. काल संध्याकाळी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. त्यावेळी पेट्रोल पंपावर आडोशाला थांबलेल्या लोकांवर तसेच इंधन भरण्यासाठी आलेल्या गाड्यांवर हे भलंमोठ होर्डिंग कोसळलं.
कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी भावेश भिंडे मातोश्रीवर काय करत होता? असा थेट सवाल विचारला आहे. “ज्या कंपनीची ही होर्डिंग होती, त्याला मुंबई महापालिकेने नोटीस दिली होती. होर्डिंग हटवा, तुमचा कार्यकाळ संपला म्हणून सांगितलं होतं. त्या मालकाने ऐकलं नाही” असं नितेश राणे म्हणाले. “भावेश भिंडे नेमका कोणाचा पार्ट्नर आहे. संजय राऊतचा भाऊ सुनील राऊतचा त्याच्याशी काय संबंध?” असा सवाल नितेश राणेंनी केलाय. “या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीवर घेऊन गेले, उद्धव ठाकरेंसोबत त्याचा फोटो काढला होता का?” असा सवाल नितेश यांनी विचारलाय.
14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात..
मनाला चीड आणणारे हे चित्र..
त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते
हे या चित्रावरून स्पष्ट होते..
टक्केवारी साठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर..
आजही टक्केवारी साठी 14… pic.twitter.com/5OGtWxh2Pp
— Ram Kadam ( modi ka parivar ) (@ramkadam) May 14, 2024
दुर्घटनास्थळी नेत्यांमध्ये भांडण
दुर्घटनास्थळी भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये भांडणही झालं. भाजपा नेते किरीट सोम्मय्या, मिहिर कोटेचा आणि पराग शहा घटनास्थळी होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे संजय दीना पाटील तिथे आक्रमक झाले होते. घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणात इगो मीडियाचे मालक भावेश भिंडेसह अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवलाय. कलम 304, 338, 337, 34 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.