अजित पवार मुख्यमंत्री बॅनरवर की प्रत्यक्षात? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 26, 2023 | 11:41 PM

अजित पवारांची पुण्यानंतर, मुंबई आणि नागपुरातही मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा सुरु झालीय. मात्र अचानक अजित दादांना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स का लागतायत? यामागेही एक कारण आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!

अजित पवार मुख्यमंत्री बॅनरवर की प्रत्यक्षात? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : गेल्या 2 आठवड्यापासून विरोधी पक्षनेते अजित पवार चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. अजित पवार भाजपसोबत जाणार का? आणि मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चा थांबताना दिसत नाहीय. त्यातच भावी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देणारे बॅनर आता पुण्याच्या बाहेरही झळकतायत. “वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का…मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाच पक्का”, असं पोस्टर नागपुरातल्या लक्ष्मी भवन चौकात लावण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवारांनी हे पोस्टर लावलंय. याशिवाय नागपुरातच दुसरं बॅनर लागलंय. शहरातील बर्डी परिसरात हे बॅनर लागलंय. “नाशिकची द्राक्ष आणि नागपूरची संत्री…अजितदादाच होणार मुख्यमंत्री…”, असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे नागपुरात बॅनर लागल्यानं, उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात. मुंबईतल्या चेंबुरमध्येही, अजित दादा मुख्यमंत्री झाले तर, अशा आशयाचे पोस्टर लागलेत. अजित पवारांची सासुरवाडी धाराशीवच्या तेरमध्येही, दादांचे पोस्टर लावण्यात आलेत. तेरचे जावई, आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री…अजित दादा पवार…, असं पोस्टर लागलंय.

शरद पवार म्हणाले, ‘असे पोस्टर म्हणजे वेडेपणा’

आता हे अचानक, अजित पवारांची पोस्टर का झळकतायत? तर त्याचं कारण आहे, अजित पवारांनीच मुख्यमंत्रिपदाची व्यक्त केलेली इच्छा! दादा उघडपणे बोलले आणि कार्यकर्तेही पोस्टर लावण्यासाठी कामाला लागले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी असे पोस्टर म्हणजे वेडेपणा असल्याचं म्हटलंय. तर या पोस्टरबाजीवरुन, संजय राऊतांनी टोला लगावलाय. कोणतं बॅनर जोरदार हे बघण्यासाठीच, अमित शाह महाराष्ट्रात येत असल्याचं राऊत म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

नाना पटोले यांची भूमिका काय?

भाजपसोबत जाणार का? या चर्चा स्वत: अजित पवारांनी खोडून काढल्यात. मात्र दादा आलेच भाजपमध्ये त्याचं स्वागत आहे, असं भुवया उंचावणारं वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलंय. दादांचे कितीही पोस्टर लागले असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ज्या पक्षाचे अधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं पटोले म्हणालेत.

नाना पटोलेंचा हा युक्तिवाद निवडणुकीवरचा आहे. पण सध्या तरी तात्काळ विधानसभेच्या निवडणुका नाहीत. मग दादांची चर्चा कशासाठी? तर त्याचं कारण आहे काही दिवसांआधीचं अंजली दमानियांचं वक्तव्यं आणि त्यानंतरच्या घडामोडी.

12 एप्रिलला अंजली दमानियांनी ट्विट केलं की, 15 आमदार अपात्र होणार आणि अजित पवार भाजपसोबत जाणार. पण 12 एप्रिललाच अजित पवारांनी दमानियांच्या बोलण्यात तथ्य नसल्याचं सांगत दावा फेटाळला. 16 एप्रिलला सामनातून संजय राऊतांनी फोडाफोडी सुरु झाल्याचे संकेत दिलेत. लोकशाहीची धुळधाण, फोडाफोडीचा सिझन 2 असं राऊतांनी म्हटलंय.
17 एप्रिलला अजित पवारांच्या समर्थनात सुरुवातीला राष्ट्रवादीचे 2 आमदार आले. पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंनी दादांना उघडपणे समर्थन दिलं.

18 एप्रिलला ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीनं खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदार अजित पवारांच्या सोबत आहे. योग्यवेळी अजित पवार राज्यपालांना यादी देणार असा दावा केला. पण 18 एप्रिललाच विधानभवनात अजित पवारांच्या भेटीगाठी राष्ट्रवादीचे 7 आणि 2 अपक्ष असे 9 आमदार आले. मात्र हे आमदार कामासाठी आले असल्याचं दादांनी स्पष्ट केलं आणि 18 एप्रिललाच पत्रकार परिषद घेत, आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.

यानंतर 21 एप्रिलला, अजित पवारांनी जाहीरपणे मुख्यमंत्रिपदावर, आत्ताही दावा ठोकण्याची तयारी असल्याचं म्हटलं. दादांच्या याच वक्तव्यानंतर भावी मुख्यमंत्री किंवा दादा मुख्यमंत्री होणार असे पोस्टर झळकतायत. अर्थात दादांना पोस्टरवरुनच मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा मिळणार की प्रत्यक्ष दादांना संधी मिळणार, यासाठी वेट अँड वॉच!