Bacchu kadu | ‘सगळे आपल्या सोबत आहेत, हे….’, महायुती संदर्भात बच्चू कडू यांचं मोठं विधान
Bacchu kadu | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करण्याधी आमदार बच्चू कडू यांनी एक मागणी केली आहे. बच्चू कडू यांची अलीकडची विधान पाहिलीत की, त्यांची नेमकी भूमिकाच लक्षात येत नाही. नेमकं सतत असं बोलून बच्चू कडू यांना काय साध्य करायच आहे? हा प्रश्न निर्माण होतो.
स्वप्निल उमप
अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे अधिकृतरित्या महायुतीमध्ये आहेत. पण मनाने ते खरोखरच महायुतीसोबत आहेत का? हा प्रश्न निर्माण होतो. कारण सतत त्यांची विधान महायुतीवर टीका करणारी असतात. शिवसेना-भाजपा युतीला इशारा देणारी असतात. अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे बच्चू कडू यांची नेमकी भूमिका काय? लोकसभा-विधानसभा निवडणुकीपर्यंत ते महायुतीसोबत राहणार आहेत का? की, बच्चू कडू महायुतीमध्ये आपला वाटा वाढवून घेण्यासाठी प्रेशर पॉलिटिक्स खेळतातय का? असे विविध प्रश्न निर्माण होतात. आमदार बच्चू कडू यांनी आता एक सूचक विधान केलय.
“महायुतीच्या बैठकीचा निरोप वेळेवर सकाळी आला. बैठकीचे काय विषय हे माहीत नसतात, ते डायरेक्ट बैठकीला बोलावतात” अशी नाराजी बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. “सगळे आपल्या सोबत आहेत, हे गृहित धरून सध्या भाजपचे काम सुरू आहे. पण हे चुकीचे आहे. भाजपाने स्पष्ट केले पाहिजे. आमचे पक्ष जरी लहान असले तरी आमचं अस्तित्व आहे” असं बच्चू कडू यांनी सुनावलं. “आमचा पक्ष महाराष्ट्रात आहे, तरी जिल्हा नियोजन समिती असेल किंवा निराधार योजना असेल या संदर्भात कुठली विचारणा होत नाही. याबाबत सगळेजण नाराज आहेत” असे बच्चू कडू म्हणाले.
किती जागा देणार ?
“येत्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा देणार हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे. सगळेच घटक पक्ष नाराज आहेत” असं बच्चू कडू म्हणाले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बैठक बोलावली पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. युती धर्म पाळला गेला पाहिजे, दोन्हीबाजूंनी पाळला गेला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी आधी घटक पक्षांची चर्चा करावी आणि मग महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करावी” अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. “राजकुमार पटेल आणि आम्ही वेगळे निर्णय घेणार नाही सोबत निर्णय घेऊ” असं बच्चू कडू म्हणाले.