‘सोनिया गांधींनी केलेली चूक करु नका’, प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेंना सल्ला
"ही मोठी लढाई आहे. यात कोण असेल नसेल सांगता येणार नाही. पण ही लढाई लढावी लागेल. ही लढाई लढत असताना देशावर संकट येणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे", असं प्रकाश आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.
मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं. या सभेत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “आपण सर्वांना माणूस म्हणून बघितलं पाहिजे. मराठा समाजाचं आरक्षण दुराई स्वामीच्या केसमध्ये अडकलं आहे. त्याचं उत्तर आमच्याकडे आहे. म्हणून मी म्हणालो होतो, आम्हाला सत्ता द्या, आम्ही ते सोडवू. पण तुम्ही आग्रह धरला की, मी त्यातील सगळं मांडू, तर इथे जोरदार सामाजिक लढा सुरु आहे. निजामी मराठ्यांमधला आणि रयतेतल्या मराठ्यांमधला”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“आपण यशवंतराव चव्हाण यांचा फोटो बघितला. यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा 1962 साली मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा साताऱ्यात पहिल्यांदा सत्कार करण्यात आला. सरकार, इनामदार जहांगीरदार, सरदार असे सगळे होते, त्यांनी म्हटलं की, यशवंतराव आपण मुख्यमंत्री झालात, आम्ही तुमचा सत्कार करतो. आता हा किस्सा मजेशीर, यशवंतराव चव्हाण यांना मधोमध बसवलं. त्यांना सोन्याचा ताट दिला आणि जे काही जेवण होतं ते सोन्याच्या ताटात वाढवून खायला सांगितलं”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘जी चूक सोनिया गांधी यांनी केली ती…’
“उरलेले जे सरदार, देशमुख, इनामदार होते हे सगळे राऊंड करुन बसले आणि चांदीच्या ताटात जेवण करत बसले. यशवंतराव चव्हाण हे साध्या गरीब कुटुंबातील मराठे. हुशार होते म्हणून त्यांना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी मुख्यमंत्री केलं. पण ते खटकलं. अपमान करायचा नाही म्हणून सोन्याचा ताट आणि आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत म्हणून आपल्याला चांदीचा ताट. वेगळेपणा दाखवताना भांडण कायम राहीलं हे लक्षात राहा”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
“जोपर्यंत हा निजामी मराठा सत्तेत बसलेला आहे तोपर्यंत रयतेच्या मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न कधीच सुटणार नाही. फक्त त्यांनी एवढंच तारतम्य बाळगावं, जी चूक सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे शब्द वापरुन केली, त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतो, असं कृपा करुन आणू नये. ही मोठी लढाई आहे. यात कोण असेल नसेल सांगता येणार नाही. पण ही लढाई लढावी लागेल. ही लढाई लढत असताना देशावर संकट येणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे”, असं प्रकाश आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.