नागपूर: राज्यात पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची (vidarbha) चळवळ गतिमान होण्याची चिन्हे आहेत. त्याला कारणही तसंच आहे. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (prashant kishor) विदर्भात येऊन विदर्भाच्या चळवळीला गती देणार आहेत. 28 तारखेला प्रशांत किशोर नागपूरात (nagpur) येणार आहेत. यावेळी ते विदर्भवादी नेत्यांची बैठक घेणार असून स्वतंत्र विदर्भाबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. या बैठकीत स्वतंत्र विदर्भाचे फायदे आणि तोटे तसेच या आंदोलनाची रणनीती यावर प्रशांत किशोर माहिती देणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रशांत किशोर हे स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीचं नेतृत्व करणार की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
प्रशांत किशोर यांच्या या दौऱ्याबाबत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी माहिती दिली. येत्या 28 तारखेला प्रशांत किशोर विदर्भात येऊन विदर्भवादी नेत्यांशी चर्चा करणार आहेत. आशिष देशमुख यांच्याच निमंत्रणावरून प्रशांत किशोर विदर्भात येणार आहेत. यावेळी विदर्भ आंदोलनाची रणनीती ठरवण्यात येणार आहे. येत्या 28 सप्टेंबरला नागपूर कराराला 70 वं सुरु होत आहे, त्यानिमित्तानं 28 तारखेला सभा घेण्यात येणार असून प्रशांत किशोर या सभेला संबोधित करणार आहेत, असं आशिष देशमुख यांनी सांगितलं.
भाजपने स्वतंत्र विदर्भाची भूमिका सोडल्यामुळे ही चळवळ मागे पडली आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला गती देणार आहोत, असं आशिष देशमुख यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. वेदांता पाठोपाठ आता कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला नको. नाणार प्रकल्प विदर्भात आणावा यासाठी उद्धव ठाकरे यांना भेटलो होते. तेव्हा ते सकारात्मक होते. फडणवीसही सकारात्मक होते, त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात आला पाहिजे, असं ते म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत ना? त्यांच्याकडून विदर्भाला न्याय मिळेल ही अपेक्षा नाही. शिवसेना आणि शिंदे गटामुळे विदर्भाचं नुकसान केलंय. मुख्यमंत्री गोविंदा पथक, गणपती मंडळात जातात, त्यांनी कोकणात जाऊन रिफायनरी बाबत लोकांचा विरोध दूर करावा, असंही त्यांनी सांगितलं.
कोकणात रिफायनरी होत नसेल, विदर्भात रिफायनरी प्रकल्प आणावा. पण वेदांता नंतर रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये. विदर्भात रिफायनरी प्रकल्प चांगल्या प्रकारे होईल, इथे रोजगार मिळेल. रिफायनरी विदर्भात होऊ शकतो, याचा रिपोर्ट मी दिलाय, अशी माहितीही त्यांनी दिली.