‘पवारांनी 25 वर्षांपूर्वी सांगितलं ते आम्हाला 2 वर्षांपूर्वी समजलं, राऊतांचा टोला; आता दरेकर म्हणाले, येणारा काळच सांगेल
संजय राऊतांच्या भाजपवरील टीकेला आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊतांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल. अर्थात त्यांना लक्षात आलेला हा मुद्दा फायद्याचा आहे की तोट्याचा, हे येणाऱ्या काळात समजून येईल, असा टोला दरेकर यांनी राऊतांना लगावलाय.
मुंबई : ‘भाजपला ऐक्य नको आहे, हे शरद पवारांनी (Sharad Pawar) 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं. ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं. देश किती मागे चाललाय हे आता आम्हाला कळत आहे’, अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय. राऊतांच्या या टीकेला आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊतांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल. अर्थात त्यांना लक्षात आलेला हा मुद्दा फायद्याचा आहे की तोट्याचा, हे येणाऱ्या काळात समजून येईल, असा टोला दरेकर यांनी राऊतांना लगावलाय.
संजय राऊतांची नेमकी टीका काय?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. शरद पवार यांनी नेहमीच देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलं आहे. पवारांचे जे विचार 25 वर्षापूर्वी होते. ते आताही कायम आहेत. त्यांच्या विचारात काहीच बदल झालेला नाही. जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं हे पंताचं सरकार आहे. मुंबईतील जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका असं त्यांनी म्हटलं होतं. मुंबईतील मराठी माणसांची पकड कमी होऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं, असं राऊत म्हणाले.
सुप्रिया सुळेंना दरेकरांचं प्रत्युत्तर
प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोपांनाही उत्तर दिलंय. ईडी आणि आयकर विभाग नेत्यांसोबत त्यांच्या नातलगांनाही जाणून-बुजून त्रास देत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्याबाबत विचारलं असता, अशा प्रकारच्या आरोपांना काही महत्व द्यायचं कारण नाही. त्यात तथ्य नसतं. त्याचं कारण सीबीआय असेल किंवा अशा यंत्रणा लोकशाहीत कुणालाही विनाकारण त्रास देत नाहीत. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचा हक्क अबाधित ठेवण्याचं काम राज्यघटनेनं केलं आहे, असं उत्तर दरेकरांनी दिलंय.
त्यासाठी मन मोठं लागतं- दरेकर
त्याचबरोबर नारायण राणे यांचा लोकसभेतील व्हिडीओ शिवसेनेकडून व्हायरल केला जात आहे. त्यावर बोलताना शिवसेनेला अभिमान वाटायला हवा की राणेंसारखा महाराष्ट्रातील क्लेरिकल माणूस बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं राज्याचा मुख्यमंत्री झाला. आज भाजपकडून देशाचे उद्योगमंत्री झाले. त्याबाबत आपल्या मनात असूया असण्यापेक्षा आनंद झाला पाहिजे. आज कुठल्याही प्रकारचं कॉन्व्हेंट शिक्षण नसताना, कुठलाही राष्ट्रीय स्तरावरचा अनुभव नसताना, जेव्हा आपल्या मातीतला नेता एवढं कर्तृत्व गाजवतो. त्याचा अभिमान वाटला पाहिजे. मात्र, त्यासाठी मन मोठं लागतं. पण, शिवसेनेकडून राणेंबाबत चांगलं बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केलीय.
इतर बातम्या :