‘शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं’, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला
राणे साहेबांना मिळालेलं खातं छोटं आहे की मोठं हे येणाऱ्या काळात ते त्यांच्या कामातून दाखवून देतील. राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे. त्यांना राणे साहेबांचे खातं छोटच वाटणार, अशी टीका दरेकर यांनी केलीय.
मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर हा मोदी कॅबिनेटचा अपमान आहे, असं म्हटलंय. त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत हे प्रसारमाध्यमातून भाजपवर टीका करणे या पलीकडे अभ्यास करताना दिसत नाही. राणे साहेबांना मिळालेलं खातं छोटं आहे की मोठं हे येणाऱ्या काळात ते त्यांच्या कामातून दाखवून देतील. राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे. त्यांना राणे साहेबांचे खातं छोटच वाटणार, अशी टीका दरेकर यांनी केलीय. (Praveen Darekar’s reply to Sanjay Raut’s criticism of Narayan Rane)
केंद्र सरकराच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी पार पडला. त्यात नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. राणे यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, राऊत यांना राणे साहेबांना काही मिळाले तरी ते छोटच वाटणार याची कल्पना आम्हाला आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना राणे साहेबांची उंची माहीत होती. त्यामुळेच त्यांनी राणे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे, असा खोचक टोला दरेकरांनी लगावलाय.
‘राणे त्यांच्या कार्यपद्धतीतून दाखवून देतील’
राणे यांना मिळालेलं खातं छोट आहे,की मोठं हे येणाऱ्या काळामध्ये राणेसाहेब त्यांच्या कार्यपध्दतीतुन दाखवून देतील. त्यांना कोणतही खातं दिलं असतं तरी त्या खात्याला वजन प्राप्त करत जनतेला मदत करायचं काम ते नक्की केलं असतं, असा विश्वासही यावेळी दरेकर यांनी व्यक्त केलाय.
मंत्री झाल्यावर राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
शिवसेनेला अंगावर घेण्यासाठीच राणेंना केंद्रात मंत्रिपद देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. खरं खोटं येणारा काळ सांगेल, पण त्याची झलक राणेंनी पदभार स्वीकारताच दाखवली. राणे म्हणाले, “माझं बऱ्याच प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केलं, चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवारांनी फोन करुन अभिनंदनही केलं आणि चांगलं काम करा म्हणून शुभेच्छाही दिल्या पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या मनाचा नाही”, असा एकेरी वार राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राणेंनी हा वार केला.
संबंधित बातम्या :
Praveen Darekar’s reply to Sanjay Raut’s criticism of Narayan Rane