अध्यक्षांच्या निर्णयाने मिळणार अजितदादांना बळ, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या खटल्यात किती समानता?
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बरोबर एक वर्ष पूर्ण होत असतानाचा राष्ट्रवादीमधील मोठा आणि आक्रमक चेहरा अजितदादा पवार यांनीही बंडाचा झेंडा हाती घेतला. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर, अजित दादा यांनी म्हणून 2 जुलै 2023 ला शपथ घेतली.
मुंबई | 10 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या गटाला अधिक बळ मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बरोबर एक वर्ष पूर्ण होत असतानाचा राष्ट्रवादीमधील मोठा आणि आक्रमक चेहरा अजितदादा पवार यांनीही बंडाचा झेंडा हाती घेतला. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, अजित दादा यांनी शिंदे भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून 2 जुलैला शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या सात आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.
अजित पवार यांची बंडखोरीमुळे राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला. कारण देशातले मात्तबर नेते म्हणून ओळखले जाणारे नेते शरद पवार यांच्याच घरातून ही बंडखोरी झाली होती. शिवसेनेच्या बंडामुळे आधीच सावध असलेल्या शरद पवार यांनी लागलीच पत्रकार परिषद घेतली आणि काही जणांनी वेगळी भूमिका घेतली पण त्यांच्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार नाही असे स्पष्ट केले. त्याचसोबत राष्ट्रवादी पक्ष हा माझा पक्ष आहे असे सांगत अजितदादा यांना आव्हानही दिले.
शरद पवार यांनी न्यायालयात न जाण्याची घोषणा केली असी तरी तिकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह 9 आमदार आणि दोन खासदार यांनी शपथ घेतल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तशी अधिसूचनाही जारी केली. पक्षविरोधी कारवाई आणि पक्षप्रमुखांची परवानगी नसताना हे कृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीतील आमदार अस्वस्थ झाले. एकापातोपाठ एक आमदार अजित पवार यांच्यासोबत जाऊ लागले. पण, अजितदादा यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले याची निश्चित आकडेवारी जाहीर झाली नव्हती. त्यामुळेच अजितदादा यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यावर आपला दावा सांगत राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन बोलावले.
अजितदादा यांच्या या राष्ट्रीय अधिवेशनाला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे नेते उपस्थित राहिले. हे नेते राष्ट्रीय कार्यकारिणीतील नेते असल्यामुळे आपला पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष हे दाखविण्यात अजित पवार यशस्वी झाले. एकनाथ शिंदे यांनी जी खेळी खेळली होती अगदी त्याच पद्धतीने अजित पवार यांचीही पावले पडत होती.
विधीमंडळात राष्ट्रवादी पक्ष आणि मुख्य प्रतोद कोण असा वाद निर्माण होण्याची चिन्हे होती. यावेळीही शिंदे गटानेही खेळलेली खेळी अजितदादा गटाने खेळली. अजितदादा गटाचे मुख्य प्रतोद म्हणून अनिल पाटील तर शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्ष यांना दिले. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
अजित दादा गट आणि शरद पवार गट यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, निवडणुक आयोगासमोर झालेल्या सुनावणीला तर खुद्द शरद पवार उपस्थित होते. हा सर्व घटनाक्रम पाहता राष्ट्रवादी पक्ष कुणाकडे जाणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी संख्याबळ यांच्या आधारे दिलेला निर्णय अजितदादा यांना बळ देणारा ठरल्याची चिन्हे आहेत.
अजितदादा यांच्याकडे 30 तर शरद पवार गटाकडे 10 ते 12 आमदार असल्याची चर्चा आहे. मात्र, अध्यक्ष यांनी शिवसेनेच्या घटनेच्या आधारेही आपला निकाल दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीची घटना काय सांगते याकडे नजर टाकणे महत्वाचे आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिले आहे. मात्र, राष्ट्र्वादिचे पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार याचा निकाल येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे हे मात्र निश्चित.