Uddhav Thackeray | द्रौपदी मुर्मू आणि उद्धव ठाकरे यांची भेट अधांतरी, पण शिवसेनेचे खासदार मात्र मुर्मूंना भेटणार; धाकधूक वाढली?
द्रौपदी मुर्मू यांनी शिवसेनेत यावं म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला नाही. किंवा या निर्णयामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.
मुंबईः आज मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या द्रौपदी मुर्मू (Draudadi Murmu) या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेणार नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र शिवसेनेचे खासदार मुर्मू यांची भेट घेतील, असं महत्त्वाचं वक्तव्य भाजप नेते सी टी रवी (C T Ravi) यांनी केलं आहे. या नव्या राजकीय डावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मी यांचं आज मुंबईत आगमन होत आहे. आदिवासी समाजासाठी मुर्मू यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचं शिवसेनेनं मान्य केलं आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटानं उद्धव ठाकरेंचा मान राखण्यासाठी भाजपकडे एक मागणी केलीय. मुंबईत आल्यावर द्रौपदी मुर्मू यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंनी भेट घ्यावी, अशी विनंती केली आहे. मात्र आज मुंबईतील दौऱ्यात द्रौपदी मुर्मू या उद्धव ठाकरेंची भेट घेणार नाहीत, असं स्पष्टीकरण सी टी रवी यांनी केलंय. याउलट शिवसेनेचे खासदार मुर्मू यांची भेट घेतील, असंही सांगण्यात आलंय. त्यामुळे आमदारांनंतर खासदारही उद्धव ठाकरेंच्या शब्दाबाहेर जाऊन वेगळी चूल मांडण्याच्या तयारी आहेत, या शक्यतांना आणखी दुजोरा मिळतोय. असे खरच घडले तर उद्धव ठाकरेंसाठी ही घटनाही अधिक जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.
सी टी रवी काय म्हणाले?
द्रौपदी मुर्मू यांच्या मुंबई दौऱ्याबाबत बोलताना भाजप नेते सी टी रवी म्हणाले, द्रौपदी मुर्मू यांचं काम चांगलं आहे. त्यांनी नगरसेवक, आमदार म्हणूनही काम केलं आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो. उद्धव ठाकरे आणि द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीबाबत अजून काही निश्चित ठरलेलं नाही. मात्र 16 जुलै रोजी शिवसेना खासदार त्यांना भेटू शकतात. द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्यासाठी एक तासाचा वेळ राखून ठेवला आहे, असे सूतोवाचही सी टी रवी यांनी केले आहे. भाजप नेत्याच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेची धाकधुक आणखी वाढली आहे.
पवारांनीही पाठिंबा द्यावा-नवनीत राणा
शिवसेना खासदारांच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. देशात प्रथमच आदिवासी महिलेला सर्वोच्च स्थानावर बसण्याची संधी मिळणार आहे. या ऐतिहासिक घटनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याकरिता शरद पवारांनीही योगदान द्यावं. राष्ट्रवादी काँग्रेसनेही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
हा राजकीय निर्णय नाही- राऊत
दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांनी शिवसेनेत यावं म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला नाही. किंवा या निर्णयामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. तर आदिवासी समाजाबद्दल आम्हाला आदर आहे. ही आमची भावना आहे. त्यामुळेच आम्ही हा पाठिंबा जाहीर केल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.