Uddhav Thackeray : खासदारांचा उद्धव ठाकरेंवर दबाव, द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याची 15 खासदारांची मागणी, उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय
आता शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मात्र, मुर्मु यांनाच पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांची आहे.
मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी शिवसेना खासदारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढताना दिसत आहे. शिवसेना खासदारांची (Shivsena MP) महत्वाची बैठक आज मातोश्रीवर पार पडलीय. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी अनुपस्थित राहिल्या. तर संजय मंडलिक हे दिल्लीत आहेत. त्याबाबत त्यांनी पक्षाला आधीच कळवलं होतं. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. तसंच राज्यात शिवसेनेत मोठा भूकंप झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे आता शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मात्र, मुर्मु यांनाच पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांची आहे.
‘एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक दोन दिवसांत निर्णय घेतील. जरी एनडीएचा उमेदवार असला तरी एक आदिवासी महिला आहे, त्यामुळे त्यांच्याबाजूने मत असावं अशी मागणी सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याबाबत ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील’, अशी माहिती शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतर दिलीय.
मी नाराज नाही – संजय राऊत
दरम्यान, संजय राऊत नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलं असता पक्षप्रमुखांचा निर्णय असतो त्याबरोबर राऊत असतात. बातम्या चालवतात ते मुर्ख आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचे पक्षप्रमुख समर्थ आहेत निर्णय घ्यायला. महाराष्ट्र आणि देशाच्या भावना समजूनच ते निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
शिंदे, गवळींबाबत माहीत नाही
आजच्या बैठकीला चार पाच खासदार नव्हते, ते बाहेर होते. संजय मंडलिक दिल्लीत आहेत. इतरांनी येणार नसल्याचं कळवलं होतं. संजय बंडू जाधव आजारी आहेत. ते वारीला गेले होते. हेमंत पाटलांनी फोन केला होता. गुजरातमध्ये पूर आहे म्हणून कलाबेन डेलकर पोहोचू शकल्या नाही. अनिल देसाई कोर्टाच्या कामानिमित्त दिल्लीत आहे. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्याबाबतची माहिती नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.