President Election : सनी देओल, किर्तीकर, हेमंत गोडसेंसह 8 खासदारांचं मतदान नाही, मुर्मू की सिन्हा?; 21 जुलै रोजी देशाला मिळणार नवा राष्ट्रपती
President Election : या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव व्हिलचेअरवरून संसद भवनात आले होते. मनमोहन सिंग यांना गेल्यावर्षी कोरोना झाला होता. तेव्हापासून ते आजारी आहेत.
नवी दिल्ली: देशाचा 15 वा राष्ट्रपती निवडण्यासाठी (President Election) आज मतदान झालं. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) या उभ्या आहेत. तर, संयुक्त पुरोगामी आघाडीकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) हे उमेदवार होते. आज देशाचा नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी देशभरातील 4800 खासदार आणि आमदारांनी मतदान केलं. यावेळी मतदानासाठी देशभरात विविध ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींनी मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपचे खासदार सनी देओल, शिवसेना खासदार गजानन किर्तीकर, हेमंत गोडसे, फजुलूर रहमान आणि सादिक रहमान यांनी मतदान केलं नाही. एकूण आठ खासदारांनी आज मतदानात भाग घेतला नाही. या निवडणुकीचा निकाल गुरुवार 21 जुलै रोजी लागणार आहे.
देशभरातील 4800 खासदार आणि आमदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतला. संध्याकाळी 5 वाजता मतदान संपलं. यावेळी एकूण 99.18 टक्के मतदान झालं. अभिनेता सनी देओल हे विदेशात असल्याने ते मतदानाला येऊ शकले नाहीत. तर गजानन किर्तीकर हे आजारी असल्याने त्यांनी मतदानात भाग घेतला नाही.
मनमोहन सिंग, मुलायमसिंह व्हिलचेअरवरून आले
या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव व्हिलचेअरवरून संसद भवनात आले होते. मनमोहन सिंग यांना गेल्यावर्षी कोरोना झाला होता. तेव्हापासून ते आजारी आहेत. तर मुलायम सिंह हे सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. गेल्यावर्षी तर त्यांना रुग्णालयात अॅडमिटही करण्यात आले होते.
राष्ट्रवादींचं एक मत भाजपला
भाजपविरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला होता. मात्र, राष्ट्रवादीचंच एक मत भाजपच्या उमेदवाराला गेलं आहे. राष्ट्रवादीचे गुजरातमधील आमदार कांधल जडेजा यांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केलं आहे. विशेष म्हणजे जडेजा यांनी एक व्हिडीओ शेअर करून मुर्मू यांना मतदान केल्याचं जाहीर केलं. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. याशिवाय काँग्रेस, समाजवादी पार्टीच्या काही आमदारांनीही क्रॉस व्होटिंग केल्याचं उघड झालं आहे.