मुख्यमंत्रिपदाचा डाव हुकल्याने देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त : पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे (Prithviraj Chavan on Devendra Fadnavis).
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे (Prithviraj Chavan on Devendra Fadnavis). मुख्यमंत्रिपदाचा डाव हुकल्याने देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्या वैफल्यातूनच ते सरकारवर सारखी टीका करत आहेत, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते (Prithviraj Chavan on Devendra Fadnavis).
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “नव्या सरकारला काम करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी द्यायचा असतो असा महाराष्ट्राचा संकेत आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हा संकेत न पाळता टीका करत आहेत. मुख्यमंत्रिपदाचा डाव हुकल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातूनच ते सरकारवर टीका करत आहेत. सरकार हातातून जाण्यास ते स्वतःच जबाबदार आहेत.”
अमृता फडणवीस राजकारणात येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. मात्र, आडनावावरुन टीका करणं हे वैफल्याचं लक्षण आहे. त्यांनी सरकारच्या धोरणात्मक निर्णयांवर टीका करावी, असंही मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जो तो पक्ष आपले मंत्री ठरवेल. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीला गेले आहेत. ते येत्या 2 दिवसात मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेतील. मंत्रिमंडळात तरुणांना संधी मिळालीच पाहिजे. किमान 2 ते 3 वेळा आमदार असणाऱ्यांना पहिली संधी दिली पाहिजे. जे पहिल्यांदाच निवडून आले त्यांनी सभागृहाचे काम समजून घ्यावे.”
पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यंतरीच्या काळात आपल्याला विधानसभा अध्यक्षपदासाठी विचारणा झाल्याचीही कबुली दिली. तसेच विचारणा झाल्यानंतरही आम्ही एकमताने नाना पटोलेंच्या नावाला पसंती दिली, असंही चव्हाण यांनी नमूद केलं.
भाजपनं साम, दाम, दंड वापरुन विरोधीपक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक नेत्यांना धमक्या दिल्या. नेत्यांना नाक घासायला लावून नंतर पक्षांतर करुन घेतलं. अनेकांना संबंधित नेत्यांनी स्वखुशीने पक्षांतर केल्याचं वाटतं मात्र तसं नाही. त्यांनी धमकावून पक्षांतरं करुन घेतली. आम्हीही सरकारमध्ये होतो. मात्र, कधीही विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला नाही. भाजप मात्र विरोधपक्ष संपवत आहे. म्हणूनच आम्ही भाजपला रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
जलयुक्तशिवार ही जलसंधारण योजना आमचीच आहे. वसंतरावांची ही कल्पना होती. आम्ही सरकारमध्ये असतानाच आम्ही काही भागात ही योजना राबवण्यास सुरुवात केली. फडणवीसांनी केवळ या योजनांचं पॅकिंग आणि ब्रँडिंग केलं. खरंतर त्यांनी या योजनेचं ठेकेदारीकरण करुन भ्रष्टाचाराला वाट करुन दिली, असाही आरोप चव्हाण यांनी केला. तसेच बुलेट ट्रेनसारख्या अनावश्यक योजना आम्ही नक्कीच बंद करु असंही नमूद केलं.