नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महिलांचा अपमान करू नका. महिलांचा सन्मान करा, असं आवाहन देशवासियांना केलं. मोदी यांच्या या आवाहनाचा शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांनी समाचार घेतला आहे. महिलांचा सन्मान करायचा असेल तर त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून करा, असा टोला प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या (maharashtra) मंत्रिमंडळात एकही महिला नाही. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण मंत्रालय एका पुरुषाकडे देण्यात आलं आहे. एकीकडे महिला सन्मानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे सुली बाई बुली होत आहे, अशी टीका करतानाच आधी महिलांना 33 टक्के आरक्षण द्या, अशी मागणीही प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
प्रियंका चतुर्वेदी यांनी यावेळी भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. भाजपच्या कार्यालयात मोठी वॉशिंग मशीन लावली आहे. महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या केसेस आता थंड बस्त्यात ठेवून दिल्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक आता भाजपला भ्रष्टाचारी पार्टी बनवत आहे, अशी टीकाही प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.
मोदींनी घराणेशाहीवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. देशात अनेक घराणी आहेत. त्यांची दुसरी आणि तिसरी पिढी आज भाजपमध्ये आहे. राजनाथ सिंह, अमित शहा, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, मुंडे आणि महाजन ही काही कुटुंबांची उदाहरणे दिली जातील. त्याचं काय करायचं? असा सवाल करत त्यांनी भाजपमधील घराणेशाहीवर टीका केली. शिवसेना, टीएमसी, आरजेडी, डीएमके, काँग्रेसचे नेतृत्व करणारे लोकांना जनतेने निवडून दिलं आहे. आपण जनतेचा अपमान करत आहात, असंही त्यांनी सांगितलं.
देशात आता ध्रुवीकरणाचं मॉडेल तयार झालं आहे. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. मोदींनी देशातील महागाई, ध्रुवीकरणावर बोलायला पाहिजे. मोदींच्या कथनी आणि करनीमध्ये फरक आहे, अशी टीकाही त्यांनी केली.