कसबा पेठेत घरातूनच उमेदवारी मिळणार? शैलेश टिळकांचं नाव चर्चेत, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं….
चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला.. मग घरातलाच उमेदवार उभा राहणार का?
योगेश बोरसे, पुणेः पुण्यातील (Kasba Peth) पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार (BJP Candidate) कोण असेल याकडे कसबा पेठराज्याचं लक्ष लागलं आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपा आता मुक्ता टिळक यांच्या घरातूनच उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली जाईल, असे म्हटले जात आहे. भाजप नेते व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आज कसबा पेठेतील पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी घरातून उमेदवारीवर चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
कसबा पेठ मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजप घरातून उमेदवारी देणार का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावरून चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. भाजपा घरातून उमेदवार देत नाही, असं कोण म्हणालं.. असा प्रति सवाल त्यांनी केला. त्यामुळे घरातून उमेदवार उभा केला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले.
मग घरातलाच उमेदवार देणार?
चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला.. मग घरातलाच उमेदवार उभा राहणार का? यावरून मात्र चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा उमेदवार ठरण्याची नेमकी प्रक्रिया काय असते हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलं.
अशा वेळी भाजपच्या तीन प्रमुख समित्या काम करतात. पुण्यातून दिल्लीत तीन नावांची शॉर्टलीस्ट पाठवली जाते. त्यानंतर दिल्लीतून भाजपाचा उमेदवार ठरतो. गल्लीत काय घोषणा द्यायच्या, तेही दिल्लीत ठरतं. त्यामुळे कसबा पेठेतील उमेदवाराचा निर्णय दिल्लीतून ठरेल, असं पाटील यांनी स्पष्ट सांगितलं…
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘ आमच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही तयारीला लागलो आहोत. कसब्यातील कार्यालयातून पुढील बैठका होतील. गिरीष बापट यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक होईल. निवडणुकीसाठी तीन समित्या केल्या आहेत. राजकीय समितीत माधुरी मिसाळ प्रमुख असतील. संघटनात्मक समितीत राजेश पांडे प्रमुख असतील तर निवडणूक संचालन समितीत २० डिपार्टमेण्ट असतील. मतांचं मार्जिन कसं वाढेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
पिंपरी चिंचवडसाठी बैठक कधी?
कसबा पेठेप्रमाणेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 25 जानेवारी रोजी यासंदर्भातील बैठक घेतली जाईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणूक येत्या २७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली आहे.