Pune Porsche accident : पुणे हिट अँड रन प्रकरण, अजित पवार गटातील आमदारावर गंभीर आरोप, Video
Pune Porsche accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात अजित पवार गटातील आमदारावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. वेदांत अग्रवालमुळे दोन लोकांचा जीव गेला. त्याला शांतपणे, आराम करता यावा, यासाठी पिझ्झा, बर्गर खायला दिला, असा आरोप विनीता देशमुख यांनी केला.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात अजित पवार गटातील आमदारावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. शनिवारी रात्री पुण्यात कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कार चालवणाऱ्या आरोपीने एका दुचाकीला उडवलं. यात दुचाकीवरील अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांनी हे प्रकरण लावून धरलय. दरम्यान आता माहिती अधिकार कार्यकर्त्या विनीता देशमुख यांनी अजित पवार गटातील आमदारावर गंभीर आरोप केला आहे.
सुनील टिंगरेंनी पुणे पोलिसांवर दबाव आणला असा विनीता देशमुख यांचा आरोप आहे. “सुनील टिंगरे येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी पोलीस अधिकारी, कॉन्स्टेबलवर दबाव आणला. आरोपी वेदांत अग्रवालमुळे दोन लोकांचा जीव गेला. त्याला शांतपणे, आराम करता यावा, यासाठी पिझ्झा, बर्गर खायला दिला. एफआयआर करताना ड्रिंक अँड ड्राइव्हची कलम काढून टाकली. एफआयआर वीक केला” असा आरोप विनीता देशमुख यांनी केला.
आरोपांवर सुनील टिंगरे काय म्हणाले?
दरम्यान सुनील टिंगरे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “पुण्यातील अपघाताशी माझा संबंध नाही. काही घटकांकडून माझी बदानामीकारक माहिती प्रसारीत केली जात आहे. विरोधकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न आहे. मी कुठलाही दबाव आणलेला नाही. संबंध नसताना नाव जोडणं चुकीच आहे” असं सुनील टिंगरे म्हणाले. ब्लड रिपोर्ट्बद्दल पुणे पोलीस काय म्हणाले?
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना आरोपीचा कुठला रिपोर्ट निगेटिव्ह आलाय का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी कुठलाही रिपोर्ट निगेटिव्ह आलेले नाही असं पुणे पोलिसांनी सांगितलं. ब्लड रिपोर्ट घेण्यात आला असून खबरदारी म्हणून दोन ठिकाणी रक्ताचे नमुने पाठवण्यात आले आहेत, तो रिपोर्ट अजून यायचा बाकी आहे असं पोलिसांनी सांगितलं.