अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराची राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यास मारहाण
Ajit Pawar and Bjp | पुणे येथे अजित पवार यांचा दौरा सुरु आहे. या दौऱ्यात भाजप आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यात वाद झाला. या वादात भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली.
योगेश बोरसे, पुणे, दि. 5 जानेवारी 2024 | राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप सहभागी झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आहे. सकाळपासून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन केले. कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांच्या उपस्थितीत ही घटना घडली.
कोणाला केली मारहाण
भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली. यामुळे कार्यक्रमस्थळी सर्वच जण आवाक झाले. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात ही घटना घडली. सातव यांना मारहाण का झाली ? याचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु या प्रकारामुळे अजित पवार नाराज झालेले दिसत होते.
अजित पवार यांनी पुण्यात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. आपण नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाणार नाही, माझे कुठेही नाव टाकतात, असे त्यांनी म्हटले. आता नव्याने आलेल्या कोरोना व्हेरियंटची तीव्रता एवढी नाही. परंतु कोरोना वाढू नये. यासाठी दक्षता घेतली पाहिजे.
मागासवर्गीय आयोगावर म्हणाले…
अजित पवार यांनी मागासवर्गीय आयोगात सरकारच्या हस्तक्षेप होत असल्याच्या प्रश्नावर म्हणाले की, आम्ही कुठला ही हस्तक्षेप करत नाही. राज्य मागासवर्गीय आयोग हा स्वायत्त आहे. त्यांच्यावर कुठला ही दबाव नाही. त्यांच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर तयारी झालेली आहे. महापालिका आणि इतर सगळ्या यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी गोखले इन्स्टिट्यूटला दिली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.