‘पुण्यात पैशांचा पाऊस’, रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप, पत्नीसह उपोषणाला बसणार, काय घडतंय?
उपोषणाला बसण्यासाठी जाताना रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ' पुण्यात पैशांचा पाऊस पडतोय. भाजपतर्फे लोकांना पैसे वाटले जात आहेत... पोलीस दबावाखाली आहेत.'
अभिजित पोते, पुणे : पुण्यातील कसबा (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर मोठा आरोप केला. भाजपकडून पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. पुण्यातील पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्यापूर्वीच रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. कसबा गणपतीसमोर पत्नीसह ते उपोषणाला बसत आहेत. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस नेतेही उपोषणाला बसत आहेत.
धंगेकर यांचे आरोप काय?
उपोषणाला बसण्यासाठी जाताना रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘ पुण्यात पैशांचा पाऊस पडतोय. भाजपतर्फे लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली. काल मी एका पोलीस अधिकाऱ्याला भेटलो. तो हतबल होता. पण आज जनतेसमोर मला हे बोलावच लागेल. भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, असा दावाही धंगेकर यांनी केलाय.
‘पोलीस दबावाखाली ‘
पुण्यातील पैसे वाटपात पोलिसांवर दबाव येत आहे. सामान्य कुटुंबातील उमेदवार विजयी होणार, असं दिसत असताना भाजपने पैसे वाटप सुरु केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येतोय.
काँग्रसचे नेमके आरोप काय?
आदर्श आचारसंहितेचा नियम धाब्यावर बसवून पैसे वाटप आणि प्रचार सुरु असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. . महाराष्ट्र हा एक आदर्श असताना गेल्या पाच दिवसात इथली स्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशसारखी झाल्याचा आरोप करण्यात आलाय. आचारसंहिता लागू झाली असताना बाहेरच्या जिल्ह्यातील माणूस थांबू शक नाही. असं असताना चंद्रकांत पाटील कसबा पेठेत पायी पदयात्रा करत होते. आम्ही स्पष्ट तक्रार दाखल केली. ७.४० वाजता मुख्यमंत्री रविवार पेठेतील कापडगंजमध्ये प्रचार करत होते. अडीच तीन वाजेपर्यंत आम्ही पोलीस कंट्रोलला केले. पण पोलीस काही कारवाई करत नाही. निवडणूक निर्णायक अधिकारी, प्रचार प्रमुखांकडे तक्रार केली. पण त्या तक्रारींची दखल यंत्रणा घेत नाहीयेत. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी नियमांचा भंग केलाय म्हणून आम्ही उपोषणाला बसणार आहेत, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी मांडली.
मतदानाची जोरदार तयारी
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच मतदान उद्या होणार आहे. कसब्यातील जवळपास 270 बूथ वरती मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी कसब्यामध्ये आणि चिंचवड मध्ये दाखल झालेले आहेत. कसब्यातील प्रत्येक बुथवर लावले जाणारे Evm यंत्रणा त्या त्या केंद्राला वाटप करण्याचं काम सध्या सुरू आहे. जवळपास 1700 पोलिसांच्या बंदोबस्तात ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.