Jitin Prasad : ज्याला दिल्लीहून आणलं त्याच्याकडूनच घात, जितीन प्रसादांची बदली घोटाळ्याने कोंडी
Jitin Prasad : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमीच भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असं सांगत असतात. त्यानंतर आता जितीन प्रसाद यांच्या खात्यातील हा घोटाळा बाहेर आल्याने आता जितीन प्रसाद यांना धडा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
लखनऊ: उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बदल्यांचा घोटाळा उघड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली आहे. अधिकारी आणि मंत्र्यांच्या ओएसडीसहीत विभागाच्या प्रमुखांवर ती कारवाई करण्यात आली आहे. असं असलं तरी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर थेट कॅबिनेट मंत्री झालेल्या जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांच्या राजकीय भवितव्याचं काय होणार? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात जितीन प्रसाद यांच्या ओएसडीची भूमिकाही सर्वाधिक राहिल्याचं सांगितलं जात आहे. हा ओएसडी (OSD) जितीन प्रसाद यांच्या अधिक जवळचा होता. मात्र, आपल्याच विभागात बदल्यांमध्ये घोटाळे होत असताना स्वत: मंत्र्याला त्याची कुणकुणही लागली नाही, याबाबतचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमीच भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असं सांगत असतात. त्यानंतर आता जितीन प्रसाद यांच्या खात्यातील हा घोटाळा बाहेर आल्याने आता जितीन प्रसाद यांना धडा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. जितीन प्रसाद यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हे मंत्रीपद आहे. अनिल कुमार पांडे हे त्यांचे विशेष कार्याधिकारी आहेत. या बदल्यांमुळे पांडे अचानक चर्चेत आले आहेत. हा घोटाळा बाहेर आल्यानंतर अनिल कुमार पांडे यांना पुन्हा त्यांच्या दिल्लीतील मूळ विभागात पाठवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याविरोधात चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
येताना दिल्लीहूनच ओएसडी आणला
अनिल पांडे हे जितीन प्रसाद यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. तेच त्यांना दिल्लीहून उत्तर प्रदेशात घेऊन आले होते. त्यामुळे जितीन प्रसाद यांना या घोटाळ्याची माहितीच नसेल असं सांगणं कठिण आहे. या प्रकरणाची योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर कॅबिनेटची बैठक घेऊन भ्रष्टाचार आणि अनियमितात खपवून घेणार नसल्याचा इशाराही मंत्र्यांना दिला.
मंत्र्यांच्या दालनावर योगींचा वॉच
मंत्र्यांच्या दालनात काय चालतं यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मंत्र्यांच्या स्टाफवरही लक्ष ठेवून आहोत, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. या घोटाळ्यानंतर जितीन प्रसाद हे दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते अमित शहांना भेटण्याची चर्चा आहे. जितीन प्रसाद यांना दिल्लीतून बोलावणं आल्याचंही सांगितलं जात आहे.
ब्राह्मण चेहरा म्हणून प्रोजेक्ट, महत्त्वाची खाती दिली
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जितीन प्रसाद यांना भाजपचा ब्राह्मण चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे जितीन प्रसाद यांच्याकडे महत्त्वाची खाती दिली जातील असं सांगितलं जात होता. त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर जितीन प्रसाद यांना महत्त्वाचं पद देण्यात आलं. त्यामुळे प्रसाद यांना पक्षात महत्त्व दिलं जात असल्याचं स्पष्ट झालं. प्रसाद यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा असल्याने त्यांना ही पदे दिली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर 100 दिवसही पूर्ण झाली नाही तोच घोटाळा बाहेर आल्याने प्रसाद यांची कोंडी झाली आहे.