ही तर सुरुवात, अजून बरेच बॅनर लागायचे आहेत, विखेंचा थोरातांवर निशाणा
अहमदनगर : लोकांना विजय सहन करण्याची क्षमता पाहिजे आणि पराभव पचवण्याचीही मानसिकता हवी, असे म्हणत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. ते शिर्डीत बोलत होते. राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर केलेल्या टीकेमुळे आता नगरमध्ये पुन्हा एकदा ‘विखे विरुद्ध थोरात’ वाद पेटण्याची […]
अहमदनगर : लोकांना विजय सहन करण्याची क्षमता पाहिजे आणि पराभव पचवण्याचीही मानसिकता हवी, असे म्हणत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. ते शिर्डीत बोलत होते.
राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर केलेल्या टीकेमुळे आता नगरमध्ये पुन्हा एकदा ‘विखे विरुद्ध थोरात’ वाद पेटण्याची चिन्ह आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले?
” लोकांना विजय सहन करण्याची क्षमता पाहिजे आणि पराभव पचवण्याचीही मानसिकता हवी. आता ही तर सुरुवात आहे. अजून बरेच बॅनर लागायचे आहेत.” असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमधून भाजपचे उमेदवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय झाल्यानंतर, विखे आणि थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय संघर्ष झाला होता. बाळासाहेब थोरातांच्या संगमनेर शहरात विखेंच्या अभिनंदनाचे लावलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. याच प्रकारावर पत्रकारांनी राधाकृष्ण विखे पाटलांना प्रश्न विचारला असता, त्यांनी बाळासाहेब थोरातांना जोरदार टोला लगावला.
काँग्रेसच्या सद्यस्थितीवर विखे पाटील काय म्हणाले?
“भविष्यात कशी रणनीती असावी हा प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. दुर्दैवाने काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले आहे. पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते खचले आहेत.” असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.