नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांची ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने सुरू केली आहे. आकसातून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे. सोनिया गांधींविरोधातील ईडी चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या (congress) कार्यकर्त्यांनी दिल्लीतील विजय चौकात धरणे आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक नेते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत पायी मार्च काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या सर्वांवर कारवाई केली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
ईडीने समन्स बजावल्याने सोनिया गांधी आज पुन्हा ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यांच्यासोबत प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही होते. सोनिया गांधी ईडी कार्यालयात गेल्यानंतर राहुल गांधी परत आले. तर सोनिया गांधी आजारी असल्याने प्रियंका यांना त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रियंका गांधी या सुद्धा सोनिया गांधी यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात आहेत.
त्यानंतर राहुल गांधी यांनी विजय चौकात काँग्रेस नेत्यांसोबत धरणे धरली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने पायी मार्च सुरू केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवलं. पण काँग्रेस नेते पायी मार्चवर ठाम राहिल्याने पार्लमेंट स्ट्रीट पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक खासदारांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला राजघाटावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
यावेळी काँग्रेस नेते अजय माकन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला राजघाटावर सत्याग्रह करायचा होता. परंतु भाजपने आम्हाला राजघाटावर सत्याग्रह करण्यास मनाई केली आहे. ते आम्हाला परवानगी देत नाहीत. 2016मध्येच नॅशनल हेराल्ड केस बंद झाली होती. ईडीने ही केस बंद केली होती. परंतु, सरकारने ही केस पुन्हा उघडली आहे, असा दावा माकन यांनी केला. काँग्रेस नेत्यांना पक्षाच्या कार्यालयात येण्यापासून रोखण्यात आलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.