मोदींना उघडं पाडणारे राज ठाकरे आज त्यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत : रईस शेख
समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली (Rais shaikh slams Raj Thackeray).
ठाणे : “मनसेच्या मोर्चाचा देशात आणि राज्यात काहीच फरक पडणार नाही. मनसे भाजपसमोर झुकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उघडं पाडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मोदींच्या इशाऱ्यावर चालत आहेत, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे”, अशी टीका समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली (Rais shaikh slams Raj Thackeray).
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (9 फेब्रुवारी) महामोर्चानंतर आझाद मैदानात भाषण केलं. या भाषणात त्यांनी “दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल”, असा इशारा घुसखोरांना दिला. त्यांच्या याच इशाऱ्यावरुन रईस शेख यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला (Rais shaikh slams Raj Thackeray).
“राज ठाकरे यांनी स्वीकारलेला हिंदुत्वाचा अजेंडा हा भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे. तलवार आणि दगड वापरण्याची परिस्थिती सध्या भारतात नाही. महाराष्ट्रात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठीच हा प्रयत्न केला जात आहे. भाजप खुल्याने हा प्रयत्न करु शकत नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि मनसेचा पूर्णपणे उपयोग केला जात आहे’, असा आरोप रईस शेख यांनी केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाजूने तर कधी मोदींच्याविरोधात अशी सतत बदलती भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या मनसेला जनतेने नाकारले आहे. यापुढेही जनता अशाप्रकारचं राजकारण करणाऱ्यांना स्वीकारणार नाही”, असा दावादेखील रईस शेख यांनी केला.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या भल्यासाठी आणि विकासासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. हे सरकार लोकांचं काम करणार आहे. मात्र याला विरोध करण्यासाठी भाजपकडून मनसेला उभं केलं गेलं आहे”, असा घणाघात रईस शेख यांनी केला.