औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादेतील सभेला अखेर औरंगाबाद पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांची सभा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय. ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलंय. तसंच याचिकाकर्त्यांना 1 लाखाचा दंडही ठोठावला आहे. राज ठाकरे यांची सभा किंवा रॅली होऊ नये यासाठी मनाई हुकुम देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका रिपब्लिकन युवा मोर्चाचे (Republican Youth Front) जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली होती. ही याचिका हाय कोर्टाने सुनावणीसाठी घेतली असता पोलीस आयुक्तांचे आदेश कोर्टासमोर सादर करण्यात आले. तसंच सभेबाबत पोलीस आयुक्तांनी सर्व काळजी घेतली असल्याचंही कोर्टाला सरकारी वकिलांनी सांगितलं. त्यानंतर संबंधित याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं हाय कोर्टाने नमूद केलं आणि याचिका कर्त्यांना 1 लाखाचा दंड ठोठावत याचिका फेटाळून लावली.
येत्या 48 तासांवर रमजान ईद आली आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असं भाषण झालं. ऐतिहासिक औरंगाबादमध्ये जी सभा होत आहे त्याला विरोध नाही. पण दोन समाजात तेढ निर्माण होत असेल तर पोलिसांनी त्यांचं भाषण तपासावं. महाराष्ट्र पेटू शकतो. त्यामुळे यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाकडून करण्यात आली होती.
राज ठाकरे यांच्या सभेला सशर्त परवानगी मिळाली असली तरी राज यांची सभा उधळून लावणार असल्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. भीम आर्मी आपल्या म्हणण्यावर अजूनही ठाम आहे. त्यामुळे मनसैनिक आणि भीम आर्मीचे कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. हा वाद सुरू असतानाच भीम आर्मीने आणखी एक इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटींचं उल्लंघन केल्यास त्यांच्या सभेत महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात येतील, असा इशारा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. या शिवाय राज यांच्या सभेला विरोध करण्यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला रवाना होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.ॉ