Raj Thackeray Aurangabad : ढोल ताशांचा गजर… फुलांचा वर्षाव आणि जोरदार घोषणाबाजी! राज ठाकरेंचं औरंगाबादेत जंगी स्वागत, उद्या राजगर्जना
क्रांती चौकात राज यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांचा गजर आणि फुलांच्या वर्षावात राज यांचं स्वागत झालं. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांसह शेकडो मनसैनिक क्रांती चौकात उपस्थित होते. भगवे फेटे घातलेल्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आगमनानंतर जोरदार घोषणाबाजी केली.
औरंगाबाद : मशिदींवरील भोंग्यांबाबत महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अल्टिमेटम दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेत सभेची घोषणा केली. त्यानुसार 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज औरंगाबादेत (Aurangabad) दाखल झाले आहेत. यावेळी क्रांती चौकात राज यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांचा गजर आणि फुलांच्या वर्षावात राज यांचं स्वागत झालं. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांसह शेकडो मनसैनिक क्रांती चौकात उपस्थित होते. भगवे फेटे घातलेल्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आगमनानंतर जोरदार घोषणाबाजी केली.
सकाळी पुण्यातून औरंगाबादच्या दिशेनं निघालेल्या राज ठाकरे यांचं संपूर्ण मार्गावर जागोजागी स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी मनसैनिक रस्त्यावर उभे होते. राज ठाकरे यांनीही प्रत्येक ठिकाणी थांबून, मनसैनिकांना धन्यवाद देत त्यांचे हार आणि पुष्पगुच्छाचा स्वीकार केला. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास राज ठाकरे औरंगाबादच्या क्रांती चौकात दाखल झाले. त्यावेळी जमलेल्या शेकडो मनसैनिकांनी राज यांचं जोरदार स्वागत केलं. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि राज यांच्यावर फुलांचा वर्षावही करण्यात आला. क्रांती चौकात दाखल झाल्यानंतर राज ठाकरे गाडीतून उतरले. कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि ते हॉटेलकडे रवाना झाले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन
राज ठाकरे काल पुणे मुक्कामी होते. आज पुण्यावरुन ते औरंगाबादसाठी रवाना झाले. त्यावेळी वढू-तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन राज ठाकरे यांनी घेतलं.
Maharashtra | On his way to Aurangabad to address a rally on May 1, Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray visits the Sambhaji Maharaj memorial in Pune today pic.twitter.com/TnUotCBdIF
— ANI (@ANI) April 30, 2022
शंखनाद आणि पुरोहितांचा आशीर्वाद
राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना होण्याआधी पुण्यात राजमहाल या त्यांच्या निवासस्थानी मंत्रोच्चार ऐकायला मिळाले. 100 पुरोहितांनी मंत्रपठण करत राज ठाकरे यांना आशीर्वाद दिले, तसंच शंखनादही करण्यात आला. राज ठाकरे यांच्या पुढील कार्यासाठी यश मिळो यासाठी हे मंत्रपठण करण्यात आलं.
100 ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रपठण करून राज ठाकरेंनी औरंगाबादचा रस्ता धरलाय.#RajThackeray @RajThackeray @mnsadhikrut @mnspunecity pic.twitter.com/fJrBmFxZHx
— Omkar Wable (@MrWabs) April 30, 2022