Raj Thackeray Ayodhya Tour : ‘राज ठाकरे चुहा है’ बृजभूषण सिंहांचं वादग्रस्त विधान, ‘माफी नाही तर अयोध्यात प्रवेश नाही’
उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. बरेलीतील नवाबगंजमध्ये राज ठाकरेंविरोधीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सामील झाले होते.
उत्तर प्रदेश : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) भाजप खासदार बृजभूषण सिंह आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीवर ते ठाम आहे. आता राज ठाकरे यांच्याविरोधात उत्तर भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी अयोध्येत केली. ‘राज ठाकरे माफी मांगो’, ‘राज ठाकरे चूहा है’ अशा घोषणा यावेळी राज ठाकरेंविरोधात देण्यात आल्या. दरम्यान, राज ठाकरेंविरोधात आणि त्यांच्या कृत्यांविषयी मी आधीपासून बोलतोय आणि त्यांची निंदा करतोय, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलंय. ते टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते. राज ठाकरेंनी माफी मागितली, तर उत्तर भारतीय त्यांना माफही करतील, असंही ते म्हणाले आहेत. राज ठाकरेंच्या माफीच्या मागणीवर कायम राहत भाजप खासदार यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. दिल्लीतून फोन आले तरी आता आंदोलन मागे घेणं शक्य नाही, असंही ते म्हणाले आहेत.
आज बैठक..
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक पार पडणार आहे. खासदार बृजभूषण सिंह यांनी कार्यकर्ते आणि साधू, महंतांसोबत बैठकीचं आयोजन केलंय. या बैठकीत राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली नाही, तर त्यांना अयोध्येत पायही ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका बृजभूषण सिंह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह राज ठाकरेंविरोधात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी नंदिनीनगरमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला अयोध्यातील साधू संतासह परिसरातील 50 हजार उत्तर भारतीय नागरिक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातंय. या बैठकीत राज ठाकरेंना कसं रोखायचं याबाबत रणनीती ठरवण्यात येणार आहे.
पाहा बृजभूषण सिंह काय म्हणाले?
माफी मागण्याची मागणी का?
उत्तर प्रदेशातून येणाऱ्या लोंढ्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं नुकसान होत असल्याच्या आशयाची टीका राज ठाकरेंनी केली होती. यावेळी केलेल्या वक्तव्यांचा निषेध म्हणून बृजभूषण सिंहांनी अयोध्येतील राज ठाकरेंच्या संभाव्य दौऱ्याला विरोध केलाय. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राज ठाकरेंचा दौरा आता वादात अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
अयोध्येत नेमकी काय स्थिती? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
नवाबगंजमध्ये मोर्चा
उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. बरेलीतील नवाबगंजमध्ये राज ठाकरेंविरोधीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सामील झाले होते. ब्रिजभूषण सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली नवाबगंजमधील निवासस्थानापासून ते नंदिनीनगरपर्यंत रॅली काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यात आलाय. 5 जून रोजी मनसे अध्यक्ष यांनी अयोध्येत दौरा करणार असल्याचं म्हटलंय. त्याआधीच त्यांच्या दौऱ्यावरुन राजकारण तापलंय.