राज ठाकरे यांना मराठी मुस्लिमांकडून अपेक्षा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आझाद मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत ते बोलत होते (Raj Thackeray on CAA and NRC).
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या कायद्यांविरोधात महाराष्ट्रात मुस्लीम समाजाकडून मोर्चे काढले गेले. मात्र, सीएए आणि एनआरसी कायदे हे महाराष्ट्रातील किंवा भारतीय मुस्लीम समाजाच्या विरोधात नाही, असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रातील मुस्लिमांकडून तरी सीएए आणि एनआरसीला विरोध होऊ नये, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त करुन दाखवली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आझाद मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत ते बोलत होते (Raj Thackeray on CAA and NRC).
“या देशात सीएए किंवा एनआरसीविरोधात जे काही मोर्चे निघाले, खास करुन मुसलमानांनी जे मोर्चे काढले मला त्याचा अर्थच नाही लागला. जन्मापासून जे इथे राहत आहेत त्यांना देशातून कोण बाहेर काढेल? मग काय म्हणून ताकद दाखवलीत?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला. “अधिवेशनात मी म्हटलं होतं की, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकललंच पाहिजे त्याच्याशी तडजोड होऊच शकत नाही. अनेकांना सीएए आणि एनआरसी काय आहे हे माहितीही नाही. फक्त व्हाट्सअॅपवर चॅट करुन टीका करत आहेत”, असंदेखील राज ठाकरे म्हणाले.
“आज सीएए कायदा केला आहे की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याकांवर धार्मिक अत्याचार होत असेल आणि त्यांना भारतात यायचं असेल तर भारत त्यांना नागरिकत्व देईल. 1955 सालचा हा कायदा आहे. ज्यावेळेला या देशाची फाळणी झाली त्यानंतर 1957 साली हा कायदा झाला. 1955 सालाची परिस्थिती वेगळी होती. आज 2000 मधली परिस्थिती वेगळी आहे. तो देश भारतापासून विभक्त झाला होता, तेव्हा तो देश चाचपडत होता. परंतु, आज काय परिस्थिती आहे त्या देशाची? खासकरुन पाकिस्तानासारख्या देशाची काय परिस्थिती आहे?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर दोन मुस्लीम व्यक्तींसोबत राज ठाकरेंचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमार्फत आजचा मोर्चा महाराष्ट्रातील आणि भारतातील मुस्लीम समाजाविरोधात नव्हता, असं अप्रत्यक्षपणे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांचं हे ट्विट ‘मनसे अधिकृत’ने रिट्वीट केलं आहे. “भारत फक्त आपला देश आहे. बांग्लादेशी, पाकिस्तानी आणि नायजेरियन घुसखोरांचा नाही”, असं मनसे अधिकृतने म्हटलं आहे.
भारत फक्त आपला देश आहे. बांग्लादेशी, पाकिस्तानी आणि नायजेरियन घुसखोरांचा नाही. #मनसे_महामोर्चा https://t.co/xLh88bCygX
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 9, 2020
Raj Thackeray on CAA and NRC