मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच रोखठोक भाष्य; म्हणाले, पंतप्रधानांनी सर्वांना…
पंतप्रधानांचा विचार विशाल असावा. त्यांनी देशाचा विचार करायला हवा. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे.
मुंबई: एअर बसपाठोपाठ सॅफ्रॉन प्रकल्पही महाराष्ट्राच्या बाहेर गेला आहे. त्यावरून ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने (congress) शिंदे सरकारला चांगलेच घरले आहे. तसेच भाजपवरही (bjp) जोरदार हल्ला चढवला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचे राजकीय आरोपही होत आहेत. हा वाद सुरू असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी त्यात उडी घेतली आहे. राज्यातील प्रकल्प बाहेर जाणं योग्य नाही. प्रत्येक प्रकल्प गुजरातला कसा जातो? पंतप्रधानांनी त्याकडे लक्ष द्यावं. तसेच पंतप्रधांनानी सर्व राज्यांना मुलांसारखी समान वागणूक द्यावी, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यातील बाहेर गेला म्हणजे कुठे गेला? गुजरातला गेला. तुम्ही माझी सर्व भाषणं ऐकली असतील तर पंतप्रधान हे देशाचे आहेत. एखाद्या राज्याचे नाहीत हेच मी आधीपासून सांगत आलो आहे. पंतप्रधानांना देशातील सर्व राज्य समान असायला हवीत. त्यांनी सर्व राज्यांना मुलांसारखं समान वागवलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
उद्या महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेला असता तो असामला गेला असता तर वाईट वाटलं नसतं. गुजरातला गेला. गुजरातही शेवटी देशात आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं जो प्रकल्प येतो तो गुजरातला जातो. पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावं. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे महाराष्ट्राबाबत बोलतो त्यावेळी संकुचित कसा ठरतो? असा सवाल त्यांनी केला.
पंतप्रधानांचा विचार विशाल असावा. त्यांनी देशाचा विचार करायला हवा. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. तिथल्या लोकांना घर सोडून जायची आणि इतर राज्यांमध्ये ओझं बनण्याची आवश्यकता नाही. असे प्रकल्प प्रत्येक राज्यात गेले तर देशाचाच विकास होईल, असंही ते म्हणाले.
गुजरातमध्ये उद्योगांसाठीचं सेटअप आहे. त्यामुळे प्रकल्प तिकडे जात असल्याचं भाजप नेते सांगत आहेत. भाजपचा हा मुद्दा त्यांनी खोडून काढला. तामिळनाडूत, कर्नाटकात उद्योगाचा चांगला सेटअप आहे. फक्त गुजरातमध्ये नाही. उद्योगधंद्याबाबत महाराष्ट्र कोणत्याही राज्यापेक्षा पुढे आहे. उद्योगपतींनाही महाराष्ट्र हे पहिल्या पसंतीचं राज्य राहिलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये जास्त सुविधा आहेत आणि महाराष्ट्रात कमी सुविधा आहेत असं नाही. या गोष्टीकडे राजकीय न पाहता देशाचा विकास म्हणून प्रत्येक राज्य मोठं करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.