Raj Thackeray : राज ठाकरेंसाठी राज्यपाल महोदयांची गाडी हटवली! औरंगाबादेत हॉटेल रामा इंटरनॅशनलबाहेर नेमकं काय घडलं?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर राज्यपालांची गाडी उभी होती. अशावेळी राज ठाकरे यांच्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांची गाडी पोलिसांनी हटवल्याचं पाहायला मिळालं!
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे आज पुण्यावरून औरंगाबादेत (Aurangabad) दाखल झाले. यावेळी औरंगाबादेतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत केलं. औरंगाबादेत दाखल होत राज ठाकरे क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. त्यानंतर ते निवासाची व्यवस्था करण्यात आलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलकडे रवाना झाले. मात्र, राज ठाकरे पोहोचण्यापूर्वीच हॉटेलच्या प्रवेशद्वारावर एक वेगळं चित्र पहायला मिळालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे देखील आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर राज्यपालांची गाडी उभी होती. अशावेळी राज ठाकरे यांच्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांची गाडी पोलिसांनी हटवल्याचं पाहायला मिळालं!
..आणि राज ठाकरेंसाठी हॉटेलचं प्रवेशद्वार मोकळं झालं!
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मुलाच्या रिसेप्शनसाठी राज्यपाल कोश्यारी हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्येच राज्यपालही थांबले आहेत. दरम्यान, राज ठाकरे ज्यावेळी औरंगाबादेत दाखल झाले. त्यावेळी राज्यपाल आधीच हॉटेलवर पोहोचले होते आणि त्यांची गाडी हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच उभी करण्यात आली होती. त्याचवेळी राज ठाकरे हे देखील हॉटेलवर पोहोचणार होते. मात्र, राज्यपालांची गाडी प्रवेशद्वारावर असल्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसांना विनंती केली आणि राज्यपालांची गाडी हॉटेलच्या प्रदेशद्वारापासून बाजूला काढण्याची मागणी केली. अखेर बाळा नांदगावकर यांच्या विनंतीनंतर पोलिसांनी राज्यपालांची गाडी बाजूला घेण्यास सांगितलं आणि राज ठाकरे यांच्यासाठई हॉटेलचं प्रवेशद्वार मोकळं झालं.
राज ठाकरेंचं औरंगाबादेत जंगी स्वागत
सकाळी पुण्यातून औरंगाबादच्या दिशेनं निघालेल्या राज ठाकरे यांचं संपूर्ण मार्गावर जागोजागी स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी मनसैनिक रस्त्यावर उभे होते. राज ठाकरे यांनीही प्रत्येक ठिकाणी थांबून, मनसैनिकांना धन्यवाद देत त्यांचे हार आणि पुष्पगुच्छाचा स्वीकार केला. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास राज ठाकरे औरंगाबादच्या क्रांती चौकात दाखल झाले. त्यावेळी जमलेल्या शेकडो मनसैनिकांनी राज यांचं जोरदार स्वागत केलं. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि राज यांच्यावर फुलांचा वर्षावही करण्यात आला. क्रांती चौकात दाखल झाल्यानंतर राज ठाकरे गाडीतून उतरले. कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि ते हॉटेलकडे रवाना झाले.