Raj Thackeray : बृजभूषण सिंहांच्या आव्हानाला मनसे कार्यकर्त्यांनी जुमानलं नाही! अयोध्येत जात रामलल्लाचं दर्शन, राज ठाकरेंच्या नावाचा जयघोष
बृजभूषण सिंह यांनी 5 जून रोजी अयोध्येत शक्तीप्रदर्शन केलं. मात्र, राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी मनसेचे अनेक कार्यकर्ते 5 जून रोजी अयोध्येत पोहोचले होते. इतकंच नाही तर त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं आणि मनसेच्या झेंड्यासह अयोध्येत गाडीने फेरफटकाही मारला!
अयोध्या : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपण 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आणि उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी त्याला जोरदार विरोध केला. राज ठाकरे यांनी आधी उत्तर प्रदेशच्या नागरिकांची किंवा साधू संतांची, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची (Yogi Adityanath) माफी मागावी आणि मगच अयोध्येला यावं, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. या विरोधानंतर राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत माफी मागण्यास नकार देत, महाराष्ट्रातून बृजभूषण सिंह यांना रसद पुरवली जात असल्याचा आरोप केला. एका शस्त्रक्रियेचं कारण देत राज यांनी अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचं सांगितलं. त्यानंतरही बृजभूषण सिंह यांनी 5 जून रोजी अयोध्येत शक्तीप्रदर्शन केलं. मात्र, राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी मनसेचे अनेक कार्यकर्ते 5 जून रोजी अयोध्येत पोहोचले होते. इतकंच नाही तर त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं आणि मनसेच्या झेंड्यासह अयोध्येत गाडीने फेरफटकाही मारला!
मनसेचे नेते अविनाश जाधव, दिलीप धोत्रे यांचाही अयोध्येतील एक व्हिडीओ रविवारी समोर आला होता. 5 जूनचाच मुहूर्त साधत अविनाश जाधव आणि दिलीप धोत्रे अयोध्येत पोहोचले. त्यांनी रामलल्लाचं दर्शनही घेतलं आणि तिथून निधून ते मुंबईत दाखलही झाले. अयोध्येत दाखल झाल्यानंतर अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह केलं. ‘आम्ही बरेच महाराष्ट्र सैनिक अयोध्येत आलो आहोत. रामलल्लाचे दर्शन प्रत्येक हिंदूने घेतले पाहिजे. मी सर्व मराठी माणसांना विनंती करेन की येथे आले पाहिजे. आज 5 तारीख असून एक मराठी माणूस अयोध्येत आला आहे आणि रामलल्लांचे दर्शन घेतले आहे’, असं जाधव यांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलंय.
अयोध्येत राज ठाकरे यांच्या नावाचा जयघोष
त्यानंतर आज अजून काही मनसे पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. हे मनसे कार्यकर्ते मुंबईतील आहेत. त्यात राहुल निखारगे, सुरेंद्र मुंडे, संतोष शिंदे, जगन्नाथ पाटील यांचा समावेश आहे. हे 3 जूनपासून अयोध्येत रामधाम हॉटेलमध्ये थांबले होते. रविवारी त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. तसंच पक्षाच्या झेंड्यासह त्यांनी अयोध्येत गाडीने फेरफटका मारला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजीही केली. शरयू नदी तिरावर ते महाआरतीमध्येही सहभागी झाले होते.
बृजभूषण सिंहांच्या रॅलीत 5 लाख नाही तर 5 हजार लोक!
राज ठाकरे यांनी आपण 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. विरोधामागे कारण होतं राज ठाकरे यांनी 2008 साली पुकारलेलं उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलन. या विरोधानंतर आणि शस्त्रक्रियेचं कारण देत राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला. असं असलं तरी बृजभूषण सिंह यांनी आज अयोध्येत शक्तीप्रदर्शन केलं. मात्र, त्यावेळी त्यांच्या रॅलीत केवळ 5 हजार लोकांची उपस्थिती पाहायला मिळाली!