राज ठाकरे गप्प, कार्यकर्ते संभ्रमात, निवडणुकीच्या तोंडावर मनसेत अस्वस्थता
निवडणुका तोंडावर असताना आता नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्न मनसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं चाललंय तरी काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. ED च्या चौकशीनंतर राज ठाकरे एकदमच शांत झाले आहेत. निवडणूक लढायची की नाही हेच अद्याप निश्चित झालेलं नाही.
राज ठाकरेंच्या भूमिकेनं मनसेचे नेते कार्यकर्तेही वैतागल्याचं चित्र आहे. निवडणुका तोंडावर असताना आता नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्न मनसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेत अस्वस्थता पसरली आहे.
निवडणूक लढवून उपयोग नाही, ईव्हीम सेट आहे अशी एका गटाची भूमिका आहे, तर दुसऱ्या बाजूला निवडणूक लढवण्यावर एक गट ठाम आहे. निवडणुकीत लोकांसमोर जायलाच हवं अन्यथा लोक रस्त्यावरही फिरू देणार नाहीत, अशीही भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे.
त्यामुळे निवडणुकीवरुनच मनसेचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. गुरूवारी झालेल्या मनसेच्या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायवा नको असं काही नेत्यांच म्हणणं होतं. शिवाय स्वत: राज ठाकरे यांचा सुद्धा निवडणूक न लढवण्याकडे कल आहे.
मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेबद्दल नाराजी आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच मुद्दावरुन मनसेत दोन गट निर्माण झाल्याची चर्चा आहे.
जर निवडणूक न लढवण्याचा निर्णय होत असेल तर मनसेचा मोठा गट वेगळा विचार करण्याची दाट शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेतली खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे.
शरद पवार संपर्क साधणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) हे स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी चर्चा करणार आहेत. मनसेच्या भूमिकेबाबत स्वतः शरद पवार राज ठाकरेंशी बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संबंधित बातम्या