पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण (Caste Politics) केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राजकारणात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिकळांनी बांधली असा दावाही राज ठाकरे यांनी केलाय. राज यांच्या या दाव्यानंतर आता नवा वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केलीय.
राज्यात सध्या अस्वस्थता पसरली आहे. सध्या खोटा इतिहास सांगून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली होती. लोकणान्य टिळकांनी जिर्णोद्धार केला नाही. त्यांनी वर्गणी गोळा केली आणि जिर्णोद्धार करणं बाजूला राहिलं. त्यांनी समाधी जवळ वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवला आणि वाद घडवून आणला, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय.
जेम्स लेन यांचं मूळ पुस्तक आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं पुस्तक यातील शिवाजी महाराज जन्म आणि दादोजी कोंडदेव यांच्याबाबत केलेलं लिखाण सारखं आहे. नंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाच्या कॉपी आलेली आहे. त्यात मग दादोजी कोंडदेव यांच्याबाबत लिहिलेलं लिखाण का वगळलं, असा सवाल गायकवाड यांनी केलाय.
राज ठाकरे जातीवादाचं राजकारण करत आहेत. राज ठाकरे यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. राज ठाकरे यांना अटक करुन शांतता प्रस्थापित करा. आम्ही या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे खोटा इतिहास पसरवत आहेत, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय.
‘तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सगळं ध्रुवीकरण करायचं. मग एवढचं आहे, तर मग रायगडावरची समाधी ही कुणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली ती आमच्या लोकमान्य टिकळांनी बांधली. लोकमान्य टिकळांना आता तुम्ही काय ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिकळांनी जे पहिलं वर्तमानपत्र काढलं त्याचं नाव काय, मराठा… हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत’, असा घणाघात राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत केलाय.