मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर राज ठाकरे यांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, लावा बांबू…
लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवडणुकीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका विधानावर मिश्किल टिप्पणी केली आहे. काही लोकांना बांबू लावण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्याबाबत राज ठाकरे यांना विचारलं असता मग लावा म्हणा, असं मश्किल उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राज्यातील राजकीय वातावरण आणि मनसेच्या स्ट्रॅटेजीवर चर्चा झाली. तसेच पदाधिकाऱ्यांचं म्हणणंही यावेळी राज ठाकरे यांनी ऐकून घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. निवडणुकीच्या दृष्टीने आजची बैठक होती. या बैठकीमध्ये नेते मंडळींना कामं दिलेली आहेत, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राज्यात विकासाचे मुद्दे हायलाईट केले जात नाहीत, तुम्ही हे प्रश्न निवडणुकीत मांडणार आहात का? असं राज ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर राज ठाकरेंनी प्रश्न विचारणाऱ्याचीच फिरकी घेतली. मला वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉरचा निवडणुकीत प्रचार करेल. महाराष्ट्राचेच प्रश्न येतील ना हो… असं राज म्हणाले.
समाजाने ही गोष्ट ओळखावी
सध्या राज्यात जातीजातीत तेढ निर्माण केली जात आहे. राजकारणीच हे काम करत आहेत, असंही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याचा अर्थ त्यांना विकासापेक्षा जातीपातीत तेढ निर्माण करायची आहे. त्यातून हाताला मते लागतात हे त्यांना कळलंय म्हणून हे त्या प्रकारे पुढे जात आहेत. समाजाने ही गोष्ट ओळखली पाहिजे, असंही राज यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता. बांबू कार्बनडाय ऑक्साईड जास्त शोषून घेतो. आणि भरपूर ऑक्सिजन सोडतो. बांबूचे अनेक फायदे आहेत. त्याचे अनेक प्रोडक्ट्स आहेत, त्याचा विचार करू शकत नाही. त्यामुळे काही लोकांना बांबू पण लावला पाहिजे. काही लोकं आहेत. सकाळीच भोंगा वाजतो. बरोबर ना, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला होता.
भोंग्याला बांबू लावला पाहिजे
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. सकाळच्या भोंग्याला बांबू लावला पाहिजे. भोंगा वाजल्यानंतर लोक चॅनल बदलायला लागले आहेत. शरद पवार आणि काँग्रेसने तुम्हाला बांबू लावला आहे. दुसऱ्यांचे बांबू बघू नका, तुमच्याकडे आला तर त्रास होईल, असं सांगतानाच लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाला बांबू लागला. आमचा स्ट्राईक रेट त्यांच्यापेक्षाही चांगला आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.