मनसे, भाजप आणि शिंदे गटाची महायुती होणार का?; राज ठाकरे यांचं एका वाक्यात थेट उत्तर
मनसेने महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. हे मेळावे सुरू झाल्यावर तुम्हाला भरपूर खाद्य मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि आशिष शेलार यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली. तर विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. एवढंच नव्हे तर मनसेच्या मुंबईतील दीपोत्सव कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाचारण केलं होतं. त्यामुळे मनसे, भाजप आणि शिंदे गटाची जवळीक वाढत असून त्यांची महायुती होणार असल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चांवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून या चर्चांमधील हवाच काढून घेतली आहे.
राज ठाकरे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे,भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीबाबत विचारण्यात आलं. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. दीपोत्सवाचं उद्घाटन होतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं यात काही गैर आहे का? उद्या मी एखाद्या फिल्म स्टारला बोलावलं असतं तर मी चित्रपट व्यवसायात जाणार असं होतं का?, असा सवाल करत राज ठाकरे यांनी महायुतीच्या चर्चेतील हवाच काढून टाकली.
साधारण 27 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या मुंबईच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणार आहे. या मेळाव्यानंतर 28 किंवा 29 नोव्हेंबर रोजी मी कोकणाच्या दौऱ्यावर जाणार. आधी कोल्हापूरला जाणार. देवीचं दर्शन घेऊन कोकणात जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मनसेने महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. हे मेळावे सुरू झाल्यावर तुम्हाला भरपूर खाद्य मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे या मेळाव्यांमध्ये काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आजची बैठक पक्षाच्या इतर संघटनांच्या संदर्भात होती. पक्षाच्या या संघटना बरीच वर्ष काम करत आहेत. काही संघटनांमध्ये काही अडचणी असतील त्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठक आहे. तसं म्हटलं तर ही अराजकीय बैठक आहे. संघटनात्मक बैठक आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सध्याचं राजकारण खालच्या पातळीवर सुरू आहे. बेछुट आरोपबिरोप सुरू आहे. जी भाषा वापरली जातेय, ती खालच्या थराची आहे. असं राजकारण मी महाराष्ट्रात यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. दुर्देव. दुसरं काय बोलणार, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.