Raj Thackeray : ‘माघार नायका’वर राज ठाकरेंचं भरसभेतून उत्तर, आंदोलनाची लिस्टच सांगितली
उद्धव ठाकरेंनी सांगावं तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का, असा सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केलाय.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला (Ayodhya) भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan singh) यांनी विरोध केला आणि यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. उत्तर प्रदेशसह देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे आणि विशेषत: राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे लागलं होतं. अयोध्येला जाण्यासाठी मनसेकडून काही ट्रेन देखील बुक करण्यात आल्या होत्या. मात्र, ही तयारी सुरू असतानाच भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती केली. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही, तोपर्यंत राज यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला. सभा, संमेलन आणि बाईक रॅली काढून त्यांनी राज ठाकरे यांना जोरदार विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे बृजभूषण सिंह यांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर राज ठाकरेंनी यांनी यावर आज पुण्यात सभा घेऊ प्रतिक्रिया उत्त्तर दिलं. पण, याचवेळी त्यांनी आंदोलनाची लिस्टच सांगितली.
आम्ही रिझल्ट देतो…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो. हे जे उत्तर प्रदेशचे बोलत आहेत. जेव्हा आंदोलन झालं होतं. 12 वर्ष झाली. रेल्वे भरती महाराष्ट्रात होती. तिकडून हजारो लोकं रेल्वे स्टेशनवर आली. मी फोटो पाहिला. ते काय आहे. पदाधिकाऱ्यांना सांगा. भेटा बोला. बोलायला गेले होते. कुठून आले काय आले. बोलता बोलता त्या बाचाबाचीत आपल्या पदाधिकाऱ्याला आईवरुन शिवी दिली. त्यानंतर जे प्रकरण सुरू झालं. ते तिथून. प्रकरण सोडाच. महाराष्ट्रातील रेल्वे भरती महाराष्ट्रातील लोकांना माहीत नाही. पेपरला जाहिराती नाही. पण यूपी बिहारमध्ये जाहिराती होत्या. त्यावर बोलायचं नाही. उद्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये भरती असेल तर त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या. त्यांंनी स्थानिक भाषेत परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील हजारो मुलांना नोकरी मिळाली. हे त्या आंदोलनाचं यश आहे,’ असं ठाकरे यावेळी म्हणालेत.
आंदोलनाची लिस्टच सांगितली
राज ठाकरे यांनी यावेळी एक आव्हानच केलंय. ते म्हणाले की, ‘हे जे टिमक्या मिरवतात ना, राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतात. तर मी सांगतो, टोलनाक्याचं आंदोलन घेतलं. 70 टोलनाके बंद झाले. म्हणजे यांची काहीच जबाबदारी नाही. बाकीच्या पक्षाची जबाबदारी नाही. टोलवाले लुटतात. त्याचं काहीच नाही. बॉलिवूडमध्ये पाक कलाकार येत होते. त्यांना देशातून हाकलून दिलं. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे. रझा अकादमीने पोलीस महिलांवर हात टाकला. त्याविरोधात मनसेने मोर्चा काढला, असं म्हणत राज ठाकरेंनी आंदोलनाची यादीच वाचून दाखवली.
मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंचं आव्हान
राज ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यावर टीकाही केलीय. ते म्हणाले की, ‘कोणतं हिंदुत्व बोलता तुम्ही. उद्धव ठाकरेंनी सांगावं तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का हो. मग ती मराठीच्या प्रश्नावर असेल किंवा हिंदुत्वाच्या प्रश्नावर असेल. एक तरी केस आहे का. भूमिकाच कुठची घ्यायची नाही. 92-93 ला दंगल झाली त्यावरच बोलायचं. परवा म्हणाले. संभाजीनगरचं नामांतर झालं काय, किंवा नाही झालं काय, मी बोलतोय ना, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. पुढे ते म्हणाले की, ‘मी बोलतोय ना. त्याला काय लॉजिक आहे. इतके वर्ष केंद्रात सत्ता होती. कधी प्रश्न मिटवला. केवळ निवडणुकीसाठी जिवंत ठेवायचं आणि मते मिळवायची. याच गोष्टी यांना करायच्या आहेत. उद्या नामांतर झालं तर बोलायचं कशावर. प्रश्नच मिटला.’ असं बोलत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडलंय.