मुंबई : राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर भाषण करत असताना अनेक गौप्यस्फोट केले. राज ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आज महाराष्ट्र चाचपडतोय. अशा प्रकारचे राजकारण महाराष्ट्र बघतोय. नवीन उद्योग येत नाहीयेत. बेरोजगारी आहे. लोकं सरकारकडे बघतंय आणि सरकार कोर्टाकडे बघतंय. आताच विधानसभेच्या निवडणुका लावा. जे काय व्हायचंय ते होऊन जावू देत.
‘मला लोकांनी विचारलं हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू म्हणून कोणाला बघता. मला धर्माभिमानी हिंदुत्व हवंय. कारण मला माणसं पाहिजेत. मुस्लीम पण पाहिजे. पण जावेद अख्तर सारखे पाहिजे. द्वेषाने बघण्यासारखं काही नसतं. पण कुरापती काढत असतील तर त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. पाकिस्तानाला दोन शब्द सुनवणारा मुस्लमान पाहिजे. पाकिस्तानात जावून त्यांनी सांगितलं की, आमच्या शहरात जो हल्ला झाला तो आम्ही नाही विसरणार. अशी माणसं मला अपेक्षित आहेत.’
‘शिवसेना फुटण्यासाठी आज उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे पक्ष सोडून जात असताना मी त्यांना फोन केला होता. त्यांना बाळासाहेबांना भेटायला ही घेऊन जाणार होतो. पण नंतर नारायण राणे यांना आणू नका असा निरोप आला.’
‘स्मरणशक्ती कमी असल्यामुळे आपण विसरतो. त्यामुळे पुन्हा आठवण करुन देतो. मतदारांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. मतदारांनी उन्हातानात मतदान करायचं मग हे खेळ खेळत बसणार. आकडेवारी आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मागितलं.’
‘निवडणुकीच्या वेळेस का नाही म्हणाले. मोदी म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री होतील तेव्हा मग आक्षेप का घेतला नाही. ज्या लोकांनी तुम्हाला युती म्हणून मतदान केलं त्यांचं काय? ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या सोबत जावून बसलात. पहाटेचा शपथविधी झाला. मग काकांनी डोळे वटारले. मग दुसरीकडे काही सुरु होतं.’
‘अलिबाबा आणि त्यांचे चाळीस जण गेले. यांनाच कंटाळून गेले. मुख्यमंत्री असताना कोविड काळात कोणालाही भेटत नव्हते. आता अचानक बाहेर पडायला लागले. मग नंतर कळालं. सुरत, गुवाहाटी. महाराज सुरत लूट करुन आले होते. पण हे महाराष्ट्रातून लूट करुन सुरतला गेलेले हे पहिलेच. एकनाथ शिंदे यांना एकच सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यासाठी काम करा. उद्धव ठाकरे यांच्या मागे जावून सभा घेऊ नका.’
‘महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पेन्शन, शेतकऱ्यांचा विषय आहे. अवकाळी झाली शेतकऱ्यांना भेटा. सभा का घेत बसलेत. किती प्रश्न पडलेत. सध्या सगळीकडे सुशोभिकरण सुरु आहे. लाईटच्या खांब्यांना लाईट लावत बसलेत. संध्याकाळी मुंबई आहे की डान्सबार हेच कळत नाही. सुशोभिकरणाच्या नावाखाली १७ कोटी खर्च केले. ते जाणार मग नवीन लावणार, ते काय कायमचे आहेत.’