OBC Reservation : राज ठाकरे म्हणतात निर्णयाचे स्वागत, ओबीसी आरक्षणावर पहिली प्रतिक्रिया
आता ओबीसी आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. त्यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) पुन्हा मिळवण्यासाठी राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात संघर्ष चालला होता. त्या संघर्षाला आज यश आले आहे, आगामी निवडणुका या आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी आरक्षणासह घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाला हा एक सुखद धक्का आहे. मात्र या निर्णयानंतर लगेच राजकीय आरोप प्रत्यारोप आणि श्रेयवाद सुरू झाला. भाजप म्हणायला लागलं की हे आरक्षण आमच्यामुळेच मिळालं तर महाविकास आघाडी म्हणायला लागली की हा आयोग आमच्या काळात स्थापन झाला होता. त्यातच आता ओबीसी आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. त्यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर ट्विट करत लिहिले आहे की “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे.” अशा आशयाचे ट्विट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांचं ट्विट
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2022
आरोप प्रत्यारोप आणि श्रेयवादही रंगला
अनेक वेळा अपयश आल्यानंतर इम्पेरिकल डेटावरून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा नवा आयोग नेमत तातडीने पुन्हा नवा डेटा संकलन करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच हा नवीन तयार केलेला डेटा अलीकडेच सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. त्यावरतीच या महत्त्वपूर्ण सुनावण्या पार पडत आहेत आणि त्याचमुळे आगामी निवडणुकीत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्यासाठी काही अटींचे पालन हे राज्य सरकारला करावं लागणार आहे. काही तातडीचा डेटा हा सुप्रीम कोर्टात राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे. तो डेटा सविस्तर सादर केल्यानंतरच ओबीसी आरक्षणाचा मार्ग आणखी सुखर होणार आहे, मात्र सध्या जरी यावर सर्वत्र जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.