Raj Thackeray Thane Uttar Sabha Live: राज ठाकरेंचा भाजपला इशारा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन मागण्या!
MNS Chief Raj Thackeray Thane Uttar Sabha Full Speech LIVE विरोधकांच्या टीकेला ठाण्यात उत्तर सभा घेत राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर राज यांनी भाजपला इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोन मागण्या केल्या आहेत.
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यांबाबत आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. इतकंच नाही तर गुढीपाडव्याला केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) कौतुक केलं होतं. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली. विरोधकांच्या टीकेला ठाण्यात उत्तर सभा घेत राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर राज यांनी भाजपला इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोन मागण्या केल्या आहेत.
राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर मनसे ही भाजपची बी टीम झाल्याची टीका करण्यात आली. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदींवर जेव्हा बोलत होतो, जेव्हा त्यांच्या भूमिका पटल्या नाहीत म्हणून बोललो. नरेंद्र मोदींनी 370 कलम रद्द केल्यानंतर अभिनंदन करणारं पहिलं ट्वीट माझं होतं. मोदींसारखा पीएम मिळावा, असं बोलणारा पहिला मी होतो, मग बाकीचे बोललेत. राजीव गांधीनंतर एका व्यक्तीवर बहुमत आल्यानंतर काय काय व्हायला हवं, हेही बोललो होतो तेव्हा. आजही तेच म्हणतोय मी, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या पंतप्रधानांकडे दोन मागण्या
बाकीच्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. आता मी पंतप्रधान मोदींकडे दोन महत्वाच्या मागण्या करतोय. एक म्हणजे या देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं म्हणजे या देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल, असा कायदा आणा. आम्हाला आसुया नाहीये, आमच्याकडे एक आणि तुमच्याकडे पाचपाच… आम्हाला त्याचा नाही त्रास होत. पण ज्याप्रकारे लोकसंख्या वाढतेय, एक दिवस देश फुटेल, असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे दोन मागण्या केल्या.
‘ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला नाही’
ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक नाही बदललेला मी. आयएएल आणि एफएस या कंपनीची चौकशी होती.. कोहिनूर.. यातून मी आधीच बाहेर पडलेलो. त्या कंपनीची जेव्हा चौकशी निघाली, तेव्हा नोटीस आल्यामुळे मी ईडी कार्यालयात गेलो होतो. पवारांना नुसती चाहूल लागली की नोटीस येतेय म्हणून त्यावर केवढं नाटक केलं त्यांनी. जर या हातांनी काही पापच केलेलं नाहीये, तर त्या नोटीस राजकीय असू दे की व्यावसायिक असू दे, भिक नाही घालत मी याला, असं राज ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या :