‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

| Updated on: Mar 07, 2021 | 12:30 PM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'रत्नागिरी-राजापूर रिफायनरी' प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. (raj thackeray wrote cm uddhav thackeray for nanar refinery project)

नाणार प्रकल्प हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं
raj thackeray
Follow us on

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमकिा घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. (raj thackeray wrote cm uddhav thackeray for nanar refinery project)

राज ठाकरे यांनी राज्यातील या तिन्ही प्रमुख नेत्यांना हे पत्र लिहिलं असून त्यात कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्था कोलमडल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या चारपानी पत्रात राज यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत सल्लेही दिले आहेत. कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन राज यांनी केलं आहे.

कोकणासाठी समग्र धोरण ठरवा

राज्य सरकारने आता सामंजस्याची भूमिका घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने स्थानिकांच मत बदलवावं. हे करताना संघर्षाची भूमिका अजिबात घेऊ नये. त्याचबरोबर तातडीने कोकणाच्या पर्यटनासाठी एक समग्र धोरण ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. विकासाचं एक वेगळं मॉडेल आपल्याला जगासमोर ठेवणं शक्य आहे. नियती अशी संधी क्वचितच देते ती गमावू नये ही कळकळीची विनंती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मनसे सहकार्य करणार, आराखडाही देणार

सरकारने नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू, असं सांगतानाच सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कोकणला विकासाचं मॉडेल करा

कोकणावर निसर्गाने सौंदर्याची जितकी मुक्त उधळण केली आहे तितकी इतर ठिकाणी फारशी आढळत नाही ह्या विषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही. कोकणचं कॅलिफोर्निया होणार असं जेंव्हा जेंव्हा मी ऐकतो तेंव्हा मला त्याचा अर्थ कळत नाही. कारण खरं तर कोकणाला विकासाच्या कुठल्याच मॉडेलची गरज नाही उलट तेच जगातील विकासाचं एक उत्कृष्ट मॉडेल बनू शकतं. अर्थात या दृष्टीने एक समग्र विचार कधीच झाला नाही जो आता व्हायला हवा असं मला वाटतं, असं राज यांनी म्हटलं आहे.

तरुण विषण्ण मनस्थितीत

कोकण जितका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तितकाच सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे आणि नरोत्तमांची खाण आहे. मी माझ्या भाषणात अनेकवेळा ह्याचा उल्लेख केला आहे की ‘कोकण किनारपट्टी’ असा जर भौगोलिक परिसर बघितला तर या भूमीने ७ भारतरत्नं दिली आहेत. त्यातील ४ तर फक्त एकट्या दापोलीमधील आहेत. पण इतकं असून देखील कोकणी तरुण विषण्ण मनस्थितीत आहे. त्याला नोकरीसाठी, रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागते. खरं तर पर्यटन कोकणाचं भवितव्य बदलू शकतं पण तो विचार नीट झाला नाही. एखादा मोठा प्रकल्प येईल, त्याने भविष्य बदलेल असे आशेचे किरण दिसले खरे पण ते प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राला परवडणार नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर सगळेच संदर्भ बदलले आहेत. आपल्या राज्यात, देशात गुंतवणूक यावी ह्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बेंगळुरूत गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरु आहे हे मी वाचलं. ही बातमी क्लेशदायक होती. आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’ (नाणार) सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

विरोधकांची भूमिका रास्त, पण मार्ग काढा

नाणार प्रकल्पाला काही स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं रास्त होतं. इथल्या जमिनी परप्रांतियांच्या घशात जाऊ शकतात ही त्यांची भीती होती जी काही प्रमाणात तेव्हा रास्तही ठरली. उद्या नवीन प्रकल्पामुळे निर्माण होणारा रोजगार आणि इतर उद्योग ह्यात कोकणी माणसाला स्थान कुठे असेल ही त्यांची शंका होती. काही पर्यावरणवाद्यांच्या मनातील ही भावना होती की कोकणाचा निसर्ग नष्ट होईल. त्यामुळेदेखील काही भूमिपुत्र चिंतेत होते. तिथे असलेल्या काही मंदिरांचाही प्रश्न होता. या मंदिरांचं काय होणार हा विचार त्यांच्या मनाला नख लावत होता. हे प्रश्न, चिंता, शंका रास्त होत्या आणि आहेत. पण आज यावर मार्ग काढणं आवश्यक आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे. (raj thackeray wrote cm uddhav thackeray for nanar refinery project)

तर ‘औद्योगिकरणात अग्रेसर महाराष्ट्र’ ही ओळख पुसेल

मला मान्य आहे की या प्रकल्पाच्या विरोधात काही स्थानिकांची असलेली भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसकट सर्व राजकीय पक्ष त्यांच्या पाठी उभे राहिले होते. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. अन्यथा ‘औद्योगिकरणात अग्रेसर महाराष्ट्र’ ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही, असा इशारा देतानाच आज कोरोनानंतर ( लॉकडाऊन नंतर) परिस्थिती बदलली आहे. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. शासन आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. अशा प्रसंगी राज्य ठामपणे उभं राहाण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे पाहायला हवं, असं त्यांनी नमूद केलं आहे.

रोजगारात कोकणी माणसाला प्राधान्य द्या

राज यांनी यावेळी स्थानिकांना रोजगार देण्यासाठी काही उपाय सूचवले आहेत. या नवीन प्रकल्पामुळे जो रोजगार निर्माण होईल त्यात कोकणी माणसाला आणि पर्यायाने महाराष्ट्रातील मराठी माणसांनाच प्राधान्य असायला हवं असा करार सरकारने गुंतवणूकदार कंपनीसोबत करायला हवा. तसंच ह्या प्रकल्पामुळे जे उद्योग निर्माण होतील त्यात देखील कोकणी तरुणांना जास्तीत जास्त संधी मिळायला हवी. त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देणं इत्यादी गोष्टी व्हायला हव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. (raj thackeray wrote cm uddhav thackeray for nanar refinery project)

तर मनसेशी संघर्षाची तयारी ठेवा

पर्यावरणीय चिंता मी देखील समजू शकतो पण ह्या तांत्रिक बाबींसाठी तज्ञांचीच मतं ग्राह्य धरायला हवीत. जैतापूर प्रकल्पाच्या वेळेस मी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ श्री. अनिल काकोडकर ह्यांच्याशी बोलून माझ्या मनातील शंका दूर केल्या होत्या. त्याच पद्धतीने तज्ज्ञांशी संवाद साधून कोकणच्या पर्यावरणाचं नुकसान कसं होणार नाही हे पहायला हवं. जो प्रकल्प रोजगाराच्या आणि स्वयं-रोजगाराच्या अमर्याद संधी आणेल तो आपण स्वीकारणं ही आजची गरज आहे. त्यासाठी कोकणातील तरुण-तरुणींनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, क्षमता आहे, त्यामुळे ह्या संधीचं सोनं माझे कोकणातील बांधव-भगिनी करतील या बाबतीत माझ्या मनात तरी शंका नाही. आणि जर त्यांच्या कोणी आड आलं तर त्या लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संघर्षाची तयारी ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (raj thackeray wrote cm uddhav thackeray for nanar refinery project)

 

संबंधित बातम्या:

पेट्रोलचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील ‘या’ शहरात इलेक्ट्रिक वाहनं आऊट ऑफ स्टॉक

‘जनता महाविकासआघाडीच्या कामावर समाधानी, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं अशक्य’

Geranium Farming| नांदेडच्या युवा शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, जिरेनियम शेतीद्वारे लाखोंची कमाई

LIVE | ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ प्रकल्पाचा विचार करा; राज ठाकरे यांचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

(raj thackeray wrote cm uddhav thackeray for nanar refinery project)