Rajendra Pawar : शरद पवार नास्तिक असल्याचा राज ठाकरेंचा आरोप, आता रोहित पवारांच्या वडिलांनीच दिले आस्तिकतेचे पुरावे
मी नास्तिक आहे की नाही हे सांगताना माझ्या धर्माचं प्रदर्शन मी करत नाही, असं शरद पवार म्हणाले. पवार यांच्यानंतर आता त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनीही पवारांच्या आस्तिकतेचे पुरावे देत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या सभेनंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनीच राज्यात जातीवादाला खतपाणी घातलं. शरद पवार नास्तिक आहेत, ते क्वचितच तुम्हाला एखाद्या मंदिरात दिसतील, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर खुद्द शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांचं खंडन केलं. मी नास्तिक आहे की नाही हे सांगताना माझ्या धर्माचं प्रदर्शन मी करत नाही, असं शरद पवार म्हणाले. पवार यांच्यानंतर आता त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनीही पवारांच्या आस्तिकतेचे पुरावे देत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय.
राजेंद्र पवार यांचं राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर
राज ठाकरे आस्तिक आणि नास्तिकतेबद्दल बोलल्याचं समजलं. मी संत गाडगेबाबा यांचा अभ्यास केलाय. त्यांची अनेक पुस्तकं वाचली. गाडगेबाबांनी अनेक घाट उभारले, झाडले, धर्मशाळा बांधल्या. गाडगेबाबा मंदिरात जात होते की नव्हते हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळे त्यांना आस्तिक म्हणायचे की नास्तिक हे आपल्याला ठरवावं लागेल. शरद पवारांबाबतही तसंच आहे. राज्यातील अनेक मंदिरांच्या विकासात त्यांचा सहभाग असावा. बारामतीतही त्यांनी जिर्णोद्धार केलेली अनेक मंदिरं आहेत. आमच्या सर्व निवडणुकांचा प्रचार कन्हेरीतून होतो. 1967 पासून आम्ही परंपरा जपली आहे. बऱ्याचदा त्यांची पावलं या मंदिराकडे वळल्याचं आम्ही पाहत आलोय. वेळ असेल तेव्हा मंदिरात दर्शनासाठी जातात. असं असताना त्यांना आस्तिक म्हणायचं की नास्तिक हे आपल्याला ठरवावं लागेल. एखाद्यानं भगवं वस्त्र परिधान केलं किंवा भगवा गंध लावला, धार्मिक वस्त्र परिधान केले म्हणजेच आस्तिक होतो असं मला वाटत नाही, अशा शब्दात राजेंद्र पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
शरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
माझा धर्म आणि देव याचं मी प्रदर्शन करत नाही. मी निवडणुकीत देवधर्म आणत नाही. मी एकाच मंदिरात जातो. बारामतीत. त्याचा मी गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे काही आदर्श आहेत. प्रबोधनकार ठाकरे हे माझे आदर्श आहेत. त्याचं लिखाण वाचलं तर त्याचं सविस्तर मार्गदर्शन होईल. देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रबोधनकारांनी टीका केली. गैरफायदा घेणाऱ्या घटकाला ठोकून काढण्याचां काम प्रबोधनकारांनी केलं. आम्ही प्रबोधनकारांचं लिखाण वाचतो. कुटुंबातील लोकं वाचत असतील असं नसाव. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असा टोला पवारांनी लगावला.
इतर बातम्या :