मोठी बातमी ! महाविकास आघाडीत फूट? समाजवादी पार्टी नव्या आघाडीत; राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग
या तिसऱ्या आघाडीचा फटका महायुतीला बसणार की महाविकास आघाडीला? अशी चर्चा रंगली आहे. या आघाडीचा फटका महायुतीपेक्षा महाविकास आघाडीलाच सर्वाधिक बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापूर | 5 ऑगस्ट 2023 : महाविकास आघाडीच्या मागे लागलेलं फुटीचं शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाहीये. आधी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे महाविकास आघाडीतील राज्यातील सत्ता गेली. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच राष्ट्रवादीत फूट पडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी झाली आहे. ही फूट ताजी असतानाच आता महाविकास आघाडीत आणखी एक मोठी फूट पडली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला समाजवादी पार्टी आघाडीतून बाहेर पडला आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होत आहे. या तिसऱ्या आघाडीत समाजवादी पार्टी सामील झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सरळ लढत होणार असल्याचं चित्र आहे. मात्र, आता या दोन्ही पक्षांना पर्याय देण्यासाठी आता तिसरी आघाडीही निर्माण झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ही तिसरी आघाडी राज्यात आकार घेत आहे. प्रागतिक विचार मंचच्या नावाने ही आघाडी तयार करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच छोटे घटक पक्ष या आघाडीत सामील झाले असून ही आघाडी राज्यात दबाव गट तयार करण्याच्या तयारीत आहे.
कोल्हापुरात बैठक
प्रागतिक विकास मंचची लवकरच कोल्हापुरात बैठक होणार आहे. महिन्याभरात ही बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीचं धोरणही या बैठकीत निश्चित केलं जाणार आहे. या बैठकीत एकूण 13 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या पक्षांची नवी आघाडी
स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, स्वराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, सीपीआय, लाल निशाण गट, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, भाकप, माकप आदी पक्षांचे प्रतिनिधी या आघाडीत सामील झाले आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला समाजवादी पार्टीही या आघाडीत सामील झाला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. समाजवादी पार्टीने प्रागतिक विकास मंचची कास धरल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचं मानलं जात आहे.
चार पक्ष स्वबळावर लढणार
दरम्यान, राज्यातील चार पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. ओवैसी यांचा एमआयएम, मायावती यांची बहुजन समाज पार्टी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष कुणाशीही युती किंवा आघाडी करणार नाही. हे चारही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर वंचित आघाडीची ठाकरे गटासोबत युती असली तरी वंचितला अजून महाविकास आघाडीत प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तिसऱ्या आघाडीचा फटका कुणाला?
दरम्यान, या तिसऱ्या आघाडीचा फटका महायुतीला बसणार की महाविकास आघाडीला? अशी चर्चा रंगली आहे. या आघाडीचा फटका महायुतीपेक्षा महाविकास आघाडीलाच सर्वाधिक बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रागतिक विकास मंचामुळे पुरोगामी मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.