राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींचा पत्ता कट झाल्याची चर्चा, स्वत: शेट्टी काय म्हणतात?
आमदारकीच्या 12 जणांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरु झालीय. त्याबाबत आता खुद्द राजू शेट्टी यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, आमदारकीच्या 12 जणांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरु झालीय. त्याबाबत आता खुद्द राजू शेट्टी यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. (Raju Shetty reaction on Governor’s appointment MLA on Legislative Council)
आपण याबाबत कधीच पाठपुरावा केला नाही. आपल्याला यात फारसा सर राहिलेला नाही. राज्यपालांनी जो काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मला फरक पडत नाही. माझ्यावर ईडीची कारवाई होत नाही. इतर कोणतीही कारवाई करता येत नाही म्हणून त्यांचा आक्षेप असेल. मी काही दरोडा घातला नाही. जनतेच्या प्रश्नावर गुन्हे दाखल झाले त्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी आमदारकीच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या चर्चेबाबत प्रतक्रिया दिली आहे.
‘पूरग्रस्तांना राज्य सरकारनं वाऱ्यावर सोडलं’
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयावरुन राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. पूरग्रस्तांबाबत किती आस्था आहे हे समोर आलं. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडायचं असं जवळपास राज्य सरकारनं ठरवलं आहे. 50 हजार रुपये जाहीर करुन दीड वर्षे झाली. त्याचं काय झालं? पूरग्रतांना आता जाहीर केलेल्या निधीचंही असंच होणार का? असा सवाल शेट्टी यांनी यावेळी केलाय.
राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा सुरु
पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून राजू शेट्टी यांनी आजपासून पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. कोल्हापूरच्या प्रयाग चिखली ते नरसिंह वाडीपर्यंत ही पंचगंगा परिक्रमा निघणार आहे. तब्बल पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमेत हजारो शेतकरी आणि स्थानिक नागरिक एकवटले आहेत. शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या 5 सप्टेंबर रोजी पूरग्रस्तांसह जलसमाधी घेऊ, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी 23 ऑगस्ट रोजी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्येच त्यांनी पंचगंगा परिक्रमेचा इशारा दिला होता. पण सरकारने या मोर्चाची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी आज पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. आज सकाळी प्रयाग चिखलीपासून ही पंचगंगा परिक्रमा सुरू झाली. त्यांनी प्रयाग संगमावरील दत्ता मंदिरात आल्यावर अभिषेक केला. त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमेचा नरसोबाच्या वाडीत समारोप होणार आहे. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी राजू शेट्टी पूरग्रस्तांसह जलसमाधीही घेणार आहे.
मागण्या काय?
पुरामुळे सांगली आणि कोल्हापुराचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण शेती वाहून गेली. स्थानिकांची घरं पाण्यात बुडाली. अनेकांचे संसार मातीमोल झाले. मात्र, सरकारकडून या पूरग्रस्तांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे या सर्वांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. तसेच 2019च्या जीआरप्रमाणे पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कुणाला वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही, असंही त्यांनी सांगितलं.\
इतर बातम्या :
राज्यपालांचा ठाकरे सरकारच्या 12 नावांवर काही आक्षेप आहे का? अजित पवारांचं भेटीनंतर पहिलं उत्तर
अनिल देशमुखांच्या जावयाची सीबीआयकडून चौकशी! महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका
Raju Shetty reaction on Governor’s appointment MLA on Legislative Council