राजू शेट्टींनी राष्ट्रवादी विरोधात शड्डू ठोकलाय? पवारांच्या स्पष्टीकरणानंतर राजू शेट्टी काय म्हणाले वाचा
त्या यादीत शेट्टी यांचं नाव असल्याचं पवारांनी म्हटलंय. याबाबत राजू शेट्टी यांना सांगितलं असता राजू शेट्टी यांच्या आमदारकीचं जाऊद्या, पूरग्रस्तांना मदत होणार की नाही यावर शरद पवारांनी बोलावं असं शेट्टी म्हणालेत. त्यामुळे शेट्टींची नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा सुरु आहे. त्याबाबत राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिलाय. शेट्टी नाराज असल्याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारला, तेव्हा पवारांनी त्या यादीत शेट्टी यांचं नाव असल्याचं पवारांनी म्हटलंय. याबाबत राजू शेट्टी यांना सांगितलं असता राजू शेट्टी यांच्या आमदारकीचं जाऊद्या, पूरग्रस्तांना मदत होणार की नाही यावर शरद पवारांनी बोलावं असं शेट्टी म्हणालेत. त्यामुळे शेट्टींची नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. (Raju Shetty’s statement after Sharad Pawar’s explanation)
पवार नेमकं काय म्हणाले?
“ते नाराज असतील त्याबाबत मला काही म्हणायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी यादी माननीय राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीनं दिलेली आहे. त्यात राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलं आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केलं मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय’, असं शरद पवार म्हणाले.
‘पूरग्रस्तांच्या मदतीवर पवारांनी बोलावं’
पवारांच्या स्पष्टीकरणाबाबत राजू शेट्टी यांना पत्रकारांकडून सांगण्यात आलं. तेव्हा आमदार व्हायचं की नाही हा मुद्दा महत्वाचा नाही. पूरग्रस्तांना मदत होणार की नाही यावर शरद पवारांनी बोलावं, असं शेट्टी म्हणाले. पूरग्रस्तांना राज्य सरकारनं मदत जाहीर केली. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा सुरु केलीय. 1 सप्टेंबरला सकाळी प्रयाग चिखलीपासून ही पंचगंगा परिक्रमा सुरू झाली. त्यांनी प्रयाग संगमावरील दत्ता मंदिरात आल्यावर अभिषेक केला. त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमेचा नरसोबाच्या वाडीत समारोप होणार आहे. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी राजू शेट्टी पूरग्रस्तांसह जलसमाधीही घेणार आहे.
राजू शेट्टींचा राष्ट्रवादीवर घणाघात
दरम्यान, आज राजू शेट्टी यांनी मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला आहे. आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले.
तर करेक्ट कार्यक्रम करेन
मला त्या यादीतून का वगळण्यात आलं हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. डावललं की नाही हे मलाही माहीत नाही, असं सांगतानाच ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशाराही त्यांनी दिला. मी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे म्हणून मला डावलले गेले आहे. मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मला आमदारकी काही मिळो न मिळो माझे आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इतर बातम्या :
“महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली”, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना जोरदार टोला
Raju Shetty’s statement after Sharad Pawar’s explanation