Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : ‘आमचे महाडिक शिवसेनेच्या संजय राऊतांपेक्षा जास्त मतांनी विजयी’, फडणवीसांचा टोला; हा विजय ‘यांना’ डेडीकेट
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनाही फडणवीसांना टोला हाणला. आमचे तिसरे उमेदवार हे शिवसेनेच्या प्रथम क्रमांकाच्या उमेदवारापेक्षाही जास्त मतांनी विजयी झाले, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) सहा जागांवर भाजपचे 3 तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक म्हणजे महाविकास आघाडीचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, हा महाविकास आघाडीसाठी आणि पर्यायानं शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. कारण सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं संजय पवार यांच्या रुपात आपला दुसरा उमेदवार दिला होता. तर भाजपनंही धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. शुक्रवारी मतदान पार पडलं, त्यानंतर तब्ब्ल 9 तासांनी म्हणजे शनिवारी पहाडे साडे तीनच्या सुमारास मतमोजणी झाली. त्यात शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) पराभूत झाले आहेत. तर भाजपच्या धनंजय महाडिकांचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर भाजपनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर मोठा जल्लोष केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही फडणवीसांना टोला हाणला. आमचे तिसरे उमेदवार हे शिवसेनेच्या प्रथम क्रमांकाच्या उमेदवारापेक्षाही जास्त मतांनी विजयी झाले, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.
लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकांना विजय समर्पित
राज्यसभेतील मोठ्या विजयानंतर फडणवीस म्हणाले की, आमच्या सगळ्यांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. आमचे तिनही उमेदवार निवडून आले आहेत. हा विजय आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. लक्ष्मणभाऊ रुग्णावाहिकेत प्रवास करुन इथपर्यंत आले. मी काल लक्ष्मण जगताप यांच्या भावाशी बोलतो की आमची एक जागा गेली तरी चालेल पण आम्हाला लक्ष्मणभाऊ महत्वाचे आहेत. पण लक्ष्मणभाऊ म्हणाले की वाटेल ते झालं तरी माझ्या पक्षासाठी मी येणारच. आमच्या मुक्ताताई टिळकही अत्यंत विपरित परिस्थितीत मतदानासाठी आल्या होत्या. त्यांचे मी आभार मानतो. आजचा विजय सर्वार्थाने महत्वाचा विजय आहे. या महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपला बहुमत दिलं होतं. पण ते बहुमत आमच्या पाठित खंजीर खुपसून काढून घेण्यात आलं. अशाप्रकारचं सरकार हे किती अंतर्विरोधाने भरलं जातं हे आजच्या विजयातून पाहायला मिळालं.
निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती… जय महाराष्ट्र ! #RajyaSabhaElections2022 #Maharashtra
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2022
संजय राऊत आणि शिवसेनेला जोरदार टोला
सगळ्यात महत्वाची गोष्टी अशी की आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं घेतलं आहे. आमचे पियुषजी 48 मतांनी निवडून आले, आमचे डॉ. बोंडे यांनाही तेवढीच मतं मिळाली. तर आमच्या धनंजय महाडिकांना 41 पाईंट 56 मतं मिळाली आहेत. जी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.
‘…तरीही आमच्या विजय झाला असता’
उद्या मुजोरी होणार असल्यामुळे सगळ्यात महत्वाचं, जे मत बाद झालं शिवसेनेचं ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता. नवाब मलिक यांना कोर्टानं परवानगी दिली असती तरी आमचा विजय झाला. हा कुठल्याही जोडतोडीचा विजय नाही. कोटा पूर्ण करुन आम्ही हा विजय मिळवला आहे. त्यामुळे मी आमचे सहकारी पक्ष, अपक्ष, आमच्यासोबत नव्हते पण आम्हाला मतदान केलं असे अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्या आमदारांचे मनापासून आभार मानतो. हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो.
राज्यसभा निवडणुकीत विजयी झालेल्या @PiyushGoyal जी, @DoctorAnilBonde जी व @dbmahadik जी यांचे अभिनंदन!
हा विजय पंतप्रधान @narendramodi जींच्या नेतत्वाचा, @JPNadda जी व @AmitShah जी यांच्या मार्गदर्शनाचा आहे!
तसेच @Dev_Fadnavis जी, @ChDadaPatil दादा यांच्या अथक प्रयत्नांचा आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 10, 2022
‘विजयाची मालिका सुरुच राहणार’
या विजयाने पुन्हा एकदा हे दाखवून दिलं की ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत, ते म्हणजे म्हणजे मुंबई नाही आणि तुम्ही म्हणजे मराठी नाही. तर महाराष्ट्र म्हणजे 12 कोटी जनता आहे. मुंबई म्हणजे मुंबईत राहणारा प्रत्येक व्यक्ती आहे आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे, या महाराष्ट्रात राहणारे आहोत. ही विजयाची मालिका सुरु झाली आहे, आता ही मालिका अशीच सुरु राहील, असा दावाही त्यांनी केलाय.
चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाची भेट
यावेळी विशेषत: आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो. आम्ही ठरवलं होतं की त्यांचा वाढदिवस असल्यानं आम्ही त्यांना जन्मदिनाची भेट देऊ. ती भेट म्हणून प्रत्यक्ष कोल्हापूरचा पैलवानच आम्ही त्यांना भेट स्वरुपात दिला आहे. महाविकास आघाडी आमदारांना घोडे समजून घोडेबाजार म्हणत होती. हे आमदारांना आवडलं नाही. आमदार काही घोडे नाहीत. त्यांनी सदसदविवेकबुद्धीनं मतदान केलं आणि आमचा विजय झाला, असा दावाही फडणवीस यांनी केलाय.