मला राहू द्या, निदान खडसेंना तरी तिकीट द्यायला हवं होतं : संजय काकडे
राज्यसभेसाठी मला राहू द्या, निदान एकनाथ खडसेंना तरी तिकीट द्यायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे (Rajya Sabha MP Sanjay Kakade) यांनी दिली आहे.
पुणे : “राज्यसभेसाठी मला राहू द्या, निदान एकनाथ खडसेंना तरी तिकीट द्यायला हवं होतं”, अशी प्रतिक्रिया भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे (Rajya Sabha MP Sanjay Kakade) यांनी दिली आहे. भाजप नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट दिलं गेलं नव्हतं. मात्र, त्यांच्या कामाची दखल पक्षश्रेष्ठी घेतील. त्यावेळी त्यांच्यासोबत जे झालं ते आज माझ्यासोबत झालं, अशी खंत संजय काकडे (Rajya Sabha MP Sanjay Kakade) यांनी बोलून दाखवली.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी आज जाहीर केली. त्याआधी पहिल्या यादीत उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आज भाजपने दुसऱ्या यादीत भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपने संजय काकडे यांचा पत्ता कट केल्याचं दिसून आलं. याशिवाय ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही तिकीट दिलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
“राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र, आता भाजपचा एक, मित्रपक्षाचा एक आणि बाहेरुन आलेले एक, असं तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे. राज्यसभेसाठी मला राहू द्या, निदान एकनाथ खडसेंना तरी तिकीट द्यायला हवं होतं. मला तिकीट दिलं नाही म्हणून दु:ख नाही. उलट मला राज्यात काम करायला आवडेल. निवडणुकीसाठी सर्वजण इच्छुक असतात. याशिवाय प्रत्येक कार्यकर्त्यांने इच्छूक राहायलाच हवं”, असं संजय काकडे म्हणाले.
“मला स्वतःला दिल्लीमध्ये रस नव्हता. मला जर खरंच तसं वाटलं असतं तर देवेंद्र फडणवीस यांना आधीच तसं सांगितलं असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यपद्धत चांगली आहे. मात्र मला दिल्लीत जायचं नव्हतं. आता देवेंद्र फडणवीस देतील ती जबाबदारी पार पाडू. कुठल्याही पक्षात जाण्याचा संबंध येत नाही”, असं संजय काकडे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
मला देशाच्या नाही, राज्याच्या राजकारणात रस : एकनाथ खडसे
भाजपचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर, महाराष्ट्रातील दोन नावांवर शिक्कामोर्तब