रोहित पवारांचा माजी मंत्री राम शिंदेंना पुन्हा झटका? शिंदेंच्या खंद्या समर्थकाची राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा
कर्जत नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि नगरसेवक नामदेव राऊत यांनी प्राथमिक आणि सक्रीय सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. नामदेव राऊत हे लवकरच आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
अहमदनगर : आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांना पुन्हा एकदा मोठा झटका दिल्याची चर्चा आहे. कारण कर्जत नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि नगरसेवक नामदेव राऊत यांनी प्राथमिक आणि सक्रीय सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. नामदेव राऊत हे लवकरच आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. यापूर्वी भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिंदे यांना हा दुसरा मोठा झटका मानला जातोय. (Ram Shinde’s supporter Namdev Raut is likely to join NCP under the guidance of MLA Rohit Pawar)
नामदेव राऊत हे माजी मंत्री राम शिंदे आणि खासदार सुजय विखे-पाटील यांचे खंदे समर्थक मानले जात होते. मात्र, राऊत हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांच्या या खेळीमुळं राम शिंदे यांनी सुजय विखे-पाटील यांना हा मोठा धक्का असणार आहे. राऊत यांच्या मागे कर्जत शहरातील मोठी ताकद असल्याचं मानलं जातं. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत शिंदे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
ऑगस्टमध्ये प्रसाद ढोकरीकरांचा राजीनामा
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राम शिंदे यांच्या कट्टर समर्थकाने पदाचा राजीनामा दिला होता. भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर यांनी पदत्याग केला आहे. ढोकरीकर सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहताना दिसतात. राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजीनाम्याच्या पत्रात काय उल्लेख
भाजपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना ढोकरीकरांनी पत्र लिहिले आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे पद सोडत असल्याचे प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितले आहे. आजारपणामुळे आपल्याला जिल्ह्यात फिरता येणार नाही, असाही उल्लेख त्यांनी राजीनाम्यात केला आहे. प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे आणि इतर लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य केल्याबद्दल ढोकरीकरांनी ऋण व्यक्त केले आहेत. पदाचा राजीनामा दिला असला, तरी भाजपचा सक्रिय सदस्य राहणार असल्याचंही ढोकरीकर यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांकडून राम शिंदेंचा पराभव
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती.
रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले.
रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचं दर्शन घडवलं होतं. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. इतकंच नाही तर राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले.
इतर बातम्या :
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज? खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Ram Shinde’s supporter Namdev Raut is likely to join NCP under the guidance of MLA Rohit Pawar