‘शिवबंधन बांधून आयुष्यभरासाठी राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला’, रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवर बाण
शिवबंधून बांधून मला आयुष्यभरासाठी राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केलाय. इतकंच नाही तर शिवबंधन बांधा आणि घरी बसा असा संदेश मला देण्यात आला, असा आरोपही कदम यांनी केलाय.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर विरोधकांकडून जोरदार हल्ले सुरु आहेत. शिवसेनेतून काहीसे दुरावले गेलेले आणि आता शिंदे गटात सहभागी माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकेचे बाण सोडले आहेत. शिवबंधन मलाही बांधले गेले आणि त्यामागची भूमिका शिवसेना (Shivsena) सोडायची नव्हती. पण शिवबंधून बांधून मला आयुष्यभरासाठी राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केलाय. इतकंच नाही तर शिवबंधन बांधा आणि घरी बसा असा संदेश मला देण्यात आला, असा आरोपही कदम यांनी केलाय.
‘रामदास कदमने आयुष्यात कधी विश्वासघात केला नाही’
रामदाक कदम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी मला शिंदे गटासोबत जावं लागलं. गद्दार कोण हे महाराष्ट्राची जनताच सांगेन. रामदास कदमने आयुष्यात कधी विश्वासघात केला नाही. कधीही हरामखोरी केली नाही. माझ्या मुलाला राजकारणापासून दूर करण्याचा प्रयत्न झाला. रामदास कदम शिंदे यांच्यासोबत मंत्री होण्यासाठी गेले नाहीत. विधान परिषदेचे सदस्यही झाले नाहीत. मला दोन मुलं आहेत. एकनाथ शिंदे सोबत आहेत. माझे मित्र देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यासाठी मी शिंदे गटात गेलो आहे. मीडियात मंत्रिपदाबाबत माझ्या नावाची चर्चा होत असेल तर मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिलीय.
रामदास कदमांचं महिला पोलिसांसोबत रक्षाबंधन
माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज महिला पोलिसांकडून राखी बांधन रक्षाबंधन साजरं केलं. त्यावेळी कदम म्हणाले की, मला एकुलती एक बहीण आहे आणि तीही गावातच आहे. आज या महिला पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरं करुन मला माझ्या बहिणीची उणीव पूर्ण झाली. मी या महिला पोलिसांना सांगितलं की नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. जेव्हाही काही अडचण असेल तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा. या महिला पोलिसांच्याच नव्हे तर सर्व महिला पोलिसांच्या पाठीशी मी तुमच्यासोबत उभा राहीन, असा शब्द कदम यांनी दिला.