रश्मी वहिनींबाबत तसं बोलायला नको होतं, रामदास कदमांची कबुली आणि…
शिवसेनेच्या आंदोलनाला मी भीक घालत नाही. महाराष्ट्र मला ओळखतो. माझा स्वभाव सर्वांना माहीत आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. स्वत:ला बाळासाहेबांचा मुलगा म्हणता मग बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा मुद्दा का घेऊन जात नाही?
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल शिंदे गटाचे नेते रामदास कदम (ramdas kadam) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. रश्मी वहिनी स्टेजवर कशासाठी? हे मी बोलायला नको होतं. माझ्याकडून शब्द निघून गेला हे मान्य करतो. अनेक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्टेजवर येतात. त्यामुळे मी त्याबाबत माझा शब्द मागे घेतो. मला काही अडचण नाही. तो शब्द माझ्याकडून अनावधानाने गेला, असं रामदास कदम म्हणाले. टीव्ही9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
रामदास कदम यांनी रश्मी ठाकरे यांच्यावरील विधानावर दिलगिरी व्यक्त केली असली तरी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानावर मात्र आपण ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पश्चात्तापाचा प्रश्नच नाही. उद्धव ठाकरेंचा अपमान होईल अशी कोणती गोष्ट मी बोललो नाही. त्यांना अडचणीत टाकण्यासारखं, त्यांची प्रतिमा डागाळण्यासारखं असं काही मी बोललो नाही. जे काही चाललं आहे, त्याचा अर्थ वेगळा घेतला जात आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे जावं एवढीच माझी भूमिका होती. तुम्ही साप साप म्हणून जमीन धोपटत असाल तर त्याला काही अर्थ नाही, असं ते म्हणाले.
शिवसेनेच्या आंदोलनाला मी भीक घालत नाही. महाराष्ट्र मला ओळखतो. माझा स्वभाव सर्वांना माहीत आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. स्वत:ला बाळासाहेबांचा मुलगा म्हणता मग बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा मुद्दा का घेऊन जात नाही? पवारांशी युती का करता? असं मला म्हणायचं होतं.
पण काही लोकांनी विपर्यास केला. शिवसेनेत उभी फूट पडली. दोन गट झाले. मलाही दुख झालं. नुकसान आमचं झालं. मी त्यांना हातजोडून सांगत होतो, राष्ट्रवादी सोडा सर्व आमदार घेऊन येतो, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मला कुणाच्याही समर्थनाची गरज नाही. मी खेडला होतो. आताच मुंबईला आलोय. मी काय बोललो हे बाकींच्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे कोणी माझ्या बाजूने बोलले नाही, असंही त्यांनी सांगितलं. माझी कोंडी किंवा शिंदे गटाची कोंडी होण्याचा प्रश्नच नाही. आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेऊन चाललो आहोत आणि उद्धव साहेब या भूमिकेसोबत नाहीत, त्यामुळे मी ते विधान केलं, असंही ते म्हणाले.
मी मराठवाड्यातील दहा जिल्हा सांभाळले आहेत. लाखो लोक माझ्यासोबत आहेत. कोण सुषमाताई? मी त्यांना ओळखत नाही. त्या उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत काय बोलल्या हे पाहा. वरळीतील त्यांचं भाषण ऐका. त्यात त्या काय म्हणाल्या. त्यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार काय? मी मराठवाड्यात नेहमी जाईल. मला कुणी अडवू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.