फडणवीस यांच्यासाठी रावसाहेब दानवे यांची फुल्ल बॅटिंग; म्हणाले, अनेक लेटरबॉम्ब…
मंत्री अब्दुल सत्तार यांनी कालचा कार्यक्रम सरकारी असूनही भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला बोलवलं नाही. सत्तार वारंवार म्हणतात की, मी जालना आणि सिल्लोड भागातील मराठा नेतृत्व संपवणार आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे वसूल केले जायचे. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, असा आरोप सचिन वाझे यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या वादात आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे उतरले आहेत. त्यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली असून विरोधकांवर निशाना साधला आहे.
रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवलं असं अनिल देशमुख म्हणाले होते. समित कदम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावेळी हा वाद संपायला हवा होता. पण त्यानंतरही राष्ट्रवादीचे अनेक नेते फडणवीस यांच्यावर आरोप करत होते. तेव्हाच फडणवीस यांनी शांत राहायला सांगितलं होतं. तुमच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता सचिन वाझे यांनी आज आरोप केला की त्यांच्याकडून अनिल देशमुख पैसे घेत होते. त्यांचे पीए पैसे घेत होते, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
पैशाच्या वाटा शोधा
ईडीची कारवाई होऊन ते पैसे अनिल देशमुखांकडे सापडले नसतील तर ते पैसे कोणत्या रस्त्याने, कोणत्या नेत्याजवळ पोहोचले याची चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुख हे मध्यस्थ आहेत. कर्ताधर्ता बाहेरच आहे. पैशाचा शोध घेण्याच्या वाटा शोधल्या पाहिजे. सचिन वाझे आणि अन्य चौकडीच्या माध्यमातून हा शोध लागेल असं वाटतं, असं दानवे यांनी सांगितलं.
बॉम्ब पडून
या पैशाचा कर्ताधर्ता सर्वांना माहीत आहे. अनिल देशमुख यांच्या घराची झडती घेतली. तो पैसा सापडला नाही. याचा अर्थ पैसा आला, घेतला आणि दिला. असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आला कुठून? दिला कुणाला? हे समोर आलं. पण शेवटी दिला कुणाकडे? हे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. मला वाटतं की हा विषय संपलेला नाही. याला बऱ्याच वाटा फुटणार आहे. या वाटा कोणत्या वाटेने जाणार हे लक्षात येईल. हा फक्त एकच बॉम्ब आहे. यापेक्षा अजूनही काही लेटरबॉम्ब आमच्याकडे पडून आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
त्याची चौकशी करा
यावेळी त्यांनी काही लोकांना टोलेही लगावले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सज्जन सदगृहस्थ आहेत. जनतेच्या हिताच्या योजना राबवणारे आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा सबळ पाठिंबा आहे. पण केवळ एकनाथ शिंदे यांना पुढे करून राज्यातील योजना आणायच्या, त्या मार्फत लूट करायचा हा एकमेव धंदा सुरू आहे.
सरकारची लूट करणं आणि आपल्याला फायदा मिळवणं हा एक भाग वेगळा आहे. पण आपल्या मतदारसंघातील जनतेच्या जमिनी बळकावणं योग्य नाही. निल्लोडमध्ये एका शेतकऱ्याची जमीन बळकावली, त्याचे कागदपत्र माझ्याकडे आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना फक्त काळे झेंडे दाखवले. त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे. यांनी कुणाच्या जमिनी बळकावल्या, कुणाकुणावर अतिक्रमण केलं याचा शोध घेतला पाहिजे. सरकार आणि पोलीस यंत्रणांनी शोध घेतला पाहिजे.काळे झेंडे दाखवणं हा एक भाग आहे. पुढे बघा काय होतं ते, असा सूचक इशारा त्यांनी दिला.