Shiv Sena: फक्त उद्धव ठाकरेच नाही, इतर तीन ठाकरेही शिवसेना वाचवण्यासाठी मैदानात, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेही सक्रिय होणार?
Shiv Sena : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संभाषण केलं. त्यांना परत येण्याचं आवाहन केलं. मात्र, शिंदे यांनी अटी घातल्यामुळे चर्चा पुढे चालली नाही.
मुंबई: एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह 50 आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेच्या तंबूत खळबळ उडाली आहे. या बंडामुळे शिवसेनेवर (shivsena) दुहेरी संकट कोसळलं आहे. एक म्हणजे सरकार अल्पमतात आलं असून सरकार वाचवणं आणि दुसरं म्हणजे शिवसेनेत उभी फूट फडल्याने पक्षाला वाचवणं. या दोन्ही संकटातून सावरण्यासाठी शिवसेनेने स्टॅटेजी आखली आहे. सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेचे काही नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. पक्ष सावरण्यासाठी आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे कामाला लागले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) पक्षाच्या सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकांशी संवाद साधून पक्षावरील मांड कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे युवासेना रस्त्यावर उतरून आमदारांविरोधातील रोष व्यक्त करत आहे. त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे कुटुंब सर्वच पातळ्यांवर लढताना दिसत असल्याचं चित्रं दिसत आहे.
उद्धव ठाकरे- गेल्या तीन दिवसात बैठकांचा सपाटा
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संभाषण केलं. त्यांना परत येण्याचं आवाहन केलं. मात्र, शिंदे यांनी अटी घातल्यामुळे चर्चा पुढे चालली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळीही त्यांनी बंडखोरांना सोबत येण्याचं आवाहन केलं. तरीही बंडखोरांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी गेल्या तीन दिवसांपासून बैठकांचा सपाटा सुरू केला. आमदार गेले तर गेले. पण पक्ष टिकला पाहिजे या हेतुने त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या उरलेल्या आमदारांशी त्यांनी आधी संवाद साधला. त्यानंतर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख, नंतर जिल्हा प्रमुख, त्यानंतर खासदार आणि नंतर नगरसेवकांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केलं. त्यानंतर काल त्यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचीही बैठक घेतली. त्यात काही ठरावही मंजूर केले. तसेच पक्ष आपल्यासोबतच असल्याचंही त्यांनी दाखवून दिलं.
आदित्य ठाकरे- गेल्या दोन दिवसात मेळाव्यांचा सपाटा
आदित्य ठाकरे यांनीही वडिलांप्रमाणेच गेल्या दोन दिवसांपासून मेळाव्यांचा सपाटा लावला आहे. मुंबईतील ठिकठिकाणी होणाऱ्या मेळाव्याला स्वत: आदित्य ठाकरे उपस्थित राहत आहेत. ते स्वत: या मेळाव्याला उपस्थित राहून शिवसेनेत उभारी भरण्याचं काम करत आहेत. शिवसेना कशी एकसंघ आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही ते करत आहेत. तसेच त्यांनी युवा सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही बोलावली आहे. त्यातही काही महत्त्वाचे ठराव करून हे ठराव शिवसेनेला देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
रश्मी ठाकरे- बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांच्या संपर्कात
शिवसेनेत फूट पडलीय. शिंदे गटाने शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारही अल्पमतात आलं आहे. उद्धव ठाकरे यांना वर्षा निवासस्थान सोडावं लागलं आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबासाठी शिंदे यांचं बंड हे आव्हानच ठरत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी कायम खंबीर उभ्या राहणाऱ्या रश्मी ठाकरे या आता मैदानात उतरल्या आहेत. रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेने त्यांना काय काय दिलं आणि आता तुम्ही काय करत आहात? असा सवाल या आमदार पत्नींना केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता आमदारांच्या घरातच बंडावरून दोन मतप्रवाह तयार झाले असून बंडखोर आमदारांवर दबाव येत आहे.
तेजस ठाकरेही सक्रिय होणार
आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व कुटुंब कामाला लागलेलं असताना तेजस ठाकरेही आता सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेजस ठाकरे ही शिवसेनेच्या मेळाव्यातून शिवसैनिकांना संबोधित करताना दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या निमित्ताने तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं सागितलं जात आहे.